निर्धारित लक्षापेक्षा जास्त पथविक्रेत्यांना पीएम-स्वनिधीचा लाभ

– ६०९७२ लाभार्थ्यांना एकूण ७६०४.५९ लक्ष रुपये कर्ज वितरीत

नागपूर :- केंद्र शासनाच्या पंतप्रधान पथ विक्रेता आत्मनिर्भर निधी (पीएम स्वनिधी) योजनेचा नागपूर महानगरपालिकेद्वारे शहरातील निर्धारित लक्षापेक्षा अधिक लाभार्थ्यांना लाभ मिळालेला आहे. मनपा आयुक्त तथा प्रशासक डॉ. अभिजीत चौधरी यांच्या मार्गदर्शनात आणि अति. आयुक्त (सामान्य) डॉ. सुनिल लहाने व उपायुक्त विशाल वाघ यांच्या नेतृत्वात मनपा समाज विभाग अंतर्गत दीनदयाळ उपाध्याय-राष्ट्रीय नागरी उपजीविका अभियान योजनेद्वारे (शहर अभियान व्यवस्थापन कक्ष) जास्तीत जास्त लाभार्थ्यांना लाभ मिळावा यादृष्टीने प्रयत्न करण्यात आले. त्याचेच परिणाम १ जानेवारी २०२४ पर्यंत शहरातील ६०९७२ लाभार्थ्यांना पहिला, दुसरा आणि तिसरा अशा तिनही टप्प्यात एकूण ७६०४.५९ लक्ष रुपये कर्ज वितरीत करण्यात आले आहे.

कोव्हिड-१९ या जागतिक महामारीदरम्यान संपूर्ण देशात लॉकडाउन लावण्यात आले होते. त्यामुळे सर्वसामान्यांसोबतच पथविक्रेत्यांच्या उपजीविकेवर विपरित परिणाम पडला. या पथविक्रेत्यांना बळ देउन त्यांना पुन्हा नव्याने व्यवसाय सुरू करण्यासाठी खेळते भांडवल पतपुरवठा तातडीने प्रदान करण्याच्या उद्देशाने केंद्र शासन पुरस्कृत ‘पंतप्रधान पथ विक्रेता आत्मनिर्भर निधी (पीएम-स्वनिधी)’ योजना सुरु करण्यात आली. सदर योजना नागपूर महानगरपालिका क्षेत्रात देखील मोठ्या प्रमाणात राबविण्यात आली, ही माहिती समाज कल्याण अधिकारी डॉ. रंजना लाडे यांनी दिली.

प्रारंभी पीएम स्वनिधी संकेतस्थळावर नागपूर महानगरपालिका क्षेत्रातील ३५९९३ पथ विक्रेत्यांची यादी अपलोड करण्यात आली. ‘सी’ व ‘डी’ प्रवर्गातील अर्जंदारांना शिफारस पत्र करिता ऑनलाईन अर्जाची लिंक दि. ७ ऑगस्ट २०२० रोजी उपलब्ध करून देण्यात आली. पीएम स्वनिधी योजनेचे केंद्र शासनाकडून मोबाईल अॅप तयार करण्यात आले. दीनदयाळ अंत्योदय योजना-राष्ट्रीय नागरी उपजीविका अभियान योजने अंतर्गत नागपूर महानगरपालिकेद्वारे घेण्यात येणाऱ्या कार्यबल समितीच्या बैठकीमध्ये बँक व्यवस्थापक, जिल्हा अग्रणी बँक यांच्या मार्फत उपस्थित बँक व्यवस्थापकांना सदर योजनेबाबत माहिती देण्यात आली.

नागपूर महानगरपालिकेकडे शिफारस पत्र मंजुरीकरिता एकूण ९०७२२ अर्ज प्राप्त झाले असून ८७९०६ अर्जदारांना शिफारस पत्र देण्यात आले. २७९२ अर्ज रद्द करण्यात आले. तसेच उर्वरित २४ अर्जदारांना शिफारस पत्र देण्याबाबतची प्रक्रिया सुरु आहे. ज्या पथ विक्रेत्यांचे आधार कार्ड मोबाईल क्रमांका सोबत लिंक करण्यात आले नाहीत. अशा पथ विक्रेत्यांना बायोमॅट्रीक डिव्हाइसद्वारे अर्ज भरण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे.

संकेतस्थळावर कर्जाचा पहिला टप्पा १० हजार रुपये, कर्जाचा दुसरा टप्पा २० हजार रुपये आणि तिसरा टप्पा ५० हजार रुपयांकरिता अर्ज करता येतो. सद्यस्थितीत ५००२० पथ विक्रेत्यांना कर्जाचा पहिला टप्पा १० हजार रुपयांचे एकूण ४९८८.२१ लक्ष रुपये, ९५१८ पथ विक्रेत्यांना कर्जाचा दुसरा टप्पा २० हजार रुपयांचे एकूण १९००.३९ लक्ष रुपये व १४३४ पथ विक्रेत्यांना कर्ज तिसरा टप्पा ५० हजार रुपयांचे एकूण ७१५.९९ लक्ष रुपये असे तिनही टप्प्यांचे एकूण ७६०४.५९ लक्ष रुपये कर्ज बँके मार्फत वितरीत करण्यात आले आहे. एकूण १०१७२७ प्राप्त अर्जांपैकी ६०९७२ पथ विक्रेत्यांना कर्ज पुरवठा करण्यात आला आहे.

पहिल्या टप्प्यातील १० हजार रुपये कर्ज पुरवठा करिता नागपूर महानगरपालिकेकडे ४८११३ पथविक्रेत्यांचे लक्ष होते. त्यापैकी मनपाने ५००२० पथविक्रेत्यांना पहिल्या टप्प्यात कर्ज प्रदान केले. हे प्रमाण १०३.९६ टक्के एवढे आहे. पीएम-स्वनिधी सोशो-इकॉनॉमिक (स्वनिधी ते समृद्धी) संकेतस्थळावर एकूण प्राप्त उद्दिष्ट ४७१०८ पैकी २०१३५ पथ विक्रेत्यांचे व त्यांच्या कुटुंबातील एकूण ४२००० सदस्यांचे अर्ज भरण्यात आले आहे. ज्यांनी सदर योजनेचा लाभ आतापर्यंत घेतला नसेल अश्या पथ विक्रेत्यांनी आपल्या मनपा झोन कार्यालय येथील समाज विकास विभागात संपर्क साधावा, असे आवाहन समाज विकास विभाग तर्फे करण्यात आले आहे.

योजनेतील ठळक बाबी

दिलेले व्याज अनुदान – १,२०,७७,१०६ रुपये

डिजिटल व्यवहार सक्रिय अर्जदार – ३२,२२८

पथविक्रेत्यांद्वारे डिजिटल व्यवहार -३२,२२९

एकूण डिजिटल व्यवहार– २,२२,६३,८२७

एकूण कॅशबॅक

रक्कम – रु. १,६९,०९,३२७ रुपये

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

मनपातर्फे आद्य शिक्षिका सावित्रीबाई फुले यांना विनम्र अभिवादन

Thu Jan 4 , 2024
नागपूर :- अज्ञानतेचा अंधार नाकारुन ज्ञान प्रकाशाला जीवनाचे ध्येय बनविणा-या विद्येच्या क्रांतिज्योती आद्य शिक्षिका सावित्रीबाई फुले यांच्या जयंती निमित्त मनपा मुख्यालयात क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या तैलचित्राला पुष्पहार अर्पण करुन विनम्र अभिवादन करण्यात आले. याप्रसंगी सर्वश्री उपायुक्त निर्भय जैन, रवींद्र भेलावे, सुरेश बगळे, सहा.आयुक्त महेश धामेचा, जनसंपर्क अधिकारी मनीष सोनी आदी उपस्थित होते. तसेच मनपातर्फे चाचा नेहरू उद्यान आणि महात्मा फुले […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com