– क्लेम विभागाकडे प्रकरण प्रलंबित – बँक ऑफ बडोदा अधिकारी सावरकर
अरोली :- धानला- चिरव्हा जिल्हा परिषद क्षेत्रातील दहेगाव पंचायत समिती सर्कल अंतर्गत येणाऱ्या दहेगाव येथील नागरिक राजेश अर्जुन वैद्य यांच्या प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजनेअंतर्गत चार वर्षांपूर्वीपासून नोंदणी असूनही व दरवर्षी विमाच्या हप्ता 436 बँकेच्या खात्यातून निकासी होत असूनही आईचे निधन चार महिन्यापूर्वी होऊनही , विम्याच्या अनुदान दोन लक्ष रुपये अजूनही बँकेत जमा होत नसल्याने लाभार्थी राजेश वैद्य अनुदानाच्या प्रतीक्षेत आहे.
याबाबत सविस्तर वृत्त असे की, लाभार्थी राजेश अर्जुन वैद्य यांच्या आई उषा अर्जुन वैद्य (50) यांचे निधन 21 सप्टेंबर 2024 ला किडनीच्या आजाराने ग्रस्त असल्याने झाले. त्यांनी चार वर्षांपूर्वी धानला येथील बँक ऑफ बडोदा येथे प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा अंतर्गत नोंदणी केली होती. त्यामुळे त्यांच्या बँकेच्या खात्यातून विम्याची रक्कम 436 रुपये दरवर्षी निकाशी व्हायची. त्यामुळे आईची निधन होताच आठ दिवसानंतर त्यांनी याबाबत मृत्यूच्या दाखला व इतर कागदपत्रे देऊन बँक ऑफ बडोदा धानला शाखेत कळविले. शाखेतील अधिकारी सावरकर यांनी क्लेम नंबर 202501180020 असलेली संपूर्ण आवश्यक कागदपत्र जोडलेली फाईल पाच जानेवारी 2025 ला सदर क्लेम विभागाकडे पाठवली. मात्र चार महिन्याच्या कालावधी लोटू नही विम्याची रक्कम दोन लक्ष रुपये अजूनही खात्यात जमा न झाल्याने लाभार्थी वारंवार बँकेच्या चकरा मारून अधिकाऱ्यांना वारंवार विचारपूस करत आहे. त्यामुळे लाभार्थी त्रस्त झालेला आहे.
याबाबत 16 फेब्रुवारी रविवारला दुपार दरम्यान सदर वार्ताहर यांनी भ्रमणध्वनीवरून बँकेचे अधिकारी सावरकर यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी सांगितले की, क्लेम विभागाने काही क्वेरी काढल्या होत्या, त्या क्वेरिंची पूर्तता पण करण्यात आलेली आहे व सदर प्रकरण क्लेम विभागाकडेच आता प्रलंबित असल्याचे त्यांनी सांगितले. क्लेम विभागाच्या अधिकाऱ्याचे नाव व त्यांच्या भ्रमणध्वनी सावरकर यांना मागितले असता त्यांनी त्यांचे नाव व भ्रमणध्वनी क्रमांक घेण्यासाठी धानला येथील बँक ऑफ बडोदा च्या शाखेत प्रत्यक्ष येण्याचे सांगितले. संबंधित वरिष्ठ विभाग व प्रशासन विभागाने तसेच संबंधित लोकप्रतिनिधींनी या प्रकरणाकडे लक्ष देऊन लाभार्थीला त्याचे अनुदान लवकरात लवकर त्याच्या खात्यात पाठवावे अशी मागणी पीडित लाभार्थी राजेश वैद्य यांनी केली आहे.