350 नागरिकांना आपात्कालीन परिस्थितीतून सुखरुप बाहेर काढले

– मनपासह सर्व बचाव संस्थांचे बचाव आणि मदतकार्य निरंतर सुरू

– मनपा आयुक्त डॉ. अभिजित चौधरी, जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी स्वतः घटनास्थळांना भेटी देवून मदत कार्याचा आढावा घेतला.

नागपूर :- शुक्रवारी (ता.२२) रात्री आलेल्या मुसळधार पावसामुळे शहरातील विविध भागांमध्ये पाणी जमा झाले तर काही ठिकाणी झाडे पडली. या सर्व ठिकाणी युद्धस्तरावर बचावकार्य करण्यात आले असून, मनपाच्या अग्निशमन व आणिबाणी सेवा पथकासह राज्य आपत्ती प्रतिसाद दल, राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दल, भारतीय सैन्य दल आणि आपदा मित्र दल या सर्वांद्वारे करण्यात आलेल्या बचावकार्यात एकूण 350 नागरिकांना आपत्कालीन परिस्थितीतून सुखरुप बाहेर काढून विस्थापित केंद्रामध्ये पाठविण्यात आले.

मुसळधार पावसामुळे शहरातील विविध ठिकाणी पाणी जमा झाल्याची माहिती मिळताच आमदार चंद्रशेखर बावनकुळे, मनपा आयुक्त तथा प्रशासक डॉ. अभिजीत चौधरी, जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर, नागपूर स्मार्ट सिटीचे मुख्य कार्यकारी अधिकारी पृथ्वीराज बी.पी., माजी महापौर तथा उपमुख्यमंत्र्यांचे मानद सचिव संदीप जोशी यांनी थेट मनपा मुख्यालयातील ‘श्रद्धेय अटल बिहारी वाजपेयी सिटी ऑपरेशन सेंटर’ (सीओसी) गाठले आणि शहरातील परिस्थितीची पाहणी शहरात सर्वत्र लावण्यात आलेल्या कॅमेऱ्यांच्या माध्यमातून केली. पाणी साचलेल्या भागात कार्यवाही करण्यासाठी सीओसी मधूनच प्रशासनाला निर्देश दिले. याशिवाय सर्व मान्यवरांनी शहरातील प्रभावित ठिकाणांना भेट देउन तेथील परिस्थितीचा आढावा घेतला.

महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री तथा नागपूरचे पालकमंत्री  देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वेळोवेळी शहरातील परिस्थितीचा आढावा घेतला जात होता. त्यांच्याकडून प्राप्त निर्देशानुसार आवश्यक त्या सर्व उपायययोजन राबविण्यात आल्या. नागपूर महानगरपालिकेच्या अग्निशमन व आणिबाणी सेवा पथकाद्वारे १५२ नागरिक, राज्य आपत्ती प्रतिसाद दलामार्फत १०५ नागरिक, राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दलाने ४५ नागरिक, भारतीय सैन्य दलाने ३६ नागरिक आणि आपदा मित्र दल यांच्या मार्फत ११ नागरिकांना आपात्कालीन परिस्थितीतून सुखरूप बाहेर काढण्यात आले. मनपासह या सर्व बचाव संस्थांच्या पथाकाद्वारे निरंतर करण्यात आलेल्या कार्यामुळे शहरातील परिस्थिती नियंत्रणात आणण्यात यश आले.

शहरातील अंबाझरी तलाव, गोरेवाडा तलाव ओव्हरफ्लो झाल्याने विविध भागात पाणी शिरले मनपा आयुक्त तथा प्रशासक डॉ. अभिजीत चौधरी यांच्या निर्देशानुसार मनपाचे अग्निशमन व आणिबाणी सेवा पथकाच्या जवानांनी त्वरित घटनास्थळ गाठून बचावकार्य सुरू केले. तसेच मनपा आयुक्त डॉ. अभिजित चौधरी आणि जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी स्वतः घटनास्थळांना भेटी देवून मदत कार्याचा आढावा घेतला. तसेच नागपूर महानगरपालिकेच्या अतिरिक्त आयुक्त  आंचल गोयल यांनी गोरेवाडा तलाव येथे पोहचून परिस्थितीचा आढावा घेतला. मनपाच्या अग्निशमन व आणिबाणी सेवा पथकाच्या जवानांनी मोरभवन बस स्थानक येथे बसमध्ये अडकलेल्या वाहन चालक, कंडक्टर यांच्यासह १४ व्यक्तींना सुखरूप बाहेर काढले. मुसळधार पावसामुळे ही बस पाण्यात बुडाली होती. तसेच प्लॉट क्रमांक ८० अंबाझरी, घाटे दुग्ध मंदिरच्या बाजूला असणाऱ्या श्री. पंचवटीकर यांच्या निवास्थानी पाणी शिरल्याने घरातील ७५ वर्षीय ज्येष्ठ महिलेसह २ व्यक्तींना सुखरूपपणे बाहेर काढण्यात आले. संगम चाळ, मुरलीधर मंदिर बर्डी झाशी राणी चौक येथे पाणी जमा झाल्याची माहिती मिळताच जवानांनी जानकी टॉकीज येथे अडकलेल्या २ व्यक्तींना सुखरूप बाहेर काढले. तर वर्मा ले-आऊट, समता लेआऊट याठिकाणी घरात जवळपास ७ ते ८ व्यक्ती अडकल्याची सूचना प्राप्त झाली. प्रत्यक्ष जाऊन बघता येथे २४ व्यक्ती असल्याचे कळले. जावानांनी त्वरित बचाव कार्य सुरू केले व सर्व व्यक्तींना सुखरूप बाहेर काढत सुरक्षित स्थळी हलविले.

मुख्य अग्निशमन अधिकारी बी.पी. चंदनखेडे यांनी मुकबधिर निवासी विद्यालयात ४० ते ५० विद्यार्थांना अडकले असल्याची सूचना प्राप्त झाली त्यांनी त्वरित मदत कार्य सुरू केले आणि एलएडी कॉलेजच्या वसतिगृहात अडकलेल्या ४१ मुलींना सुखरूप बाहेर काढले व सुरक्षित स्थळी हलविले. तसेच लोकमत चौकात पाणी जमा झाल्याने खासगी बस अडकल्याची सूचना प्राप्त झाली. जवानांनी तात्काळ मदत कार्य करीत बसमध्ये अडकलेय ११ व्यक्तींना सुखरूप बाहेर काढले.

दोन महिलांचा मृत्यू

शहरात उद्भवलेल्या पूर परिस्थितीमध्ये दोन महिलांचा दुर्दैवी मृत्यू झाला. याशिवाय १४ जनावरेही पूरामुळे मृत पावली. नागपूर शहरातील महेश नगर भागातील ७० वर्षीय श्रीमती मिराबाई पिल्ले आणि तेलंखेडी परिसरातील सुरेंद्रगड येथील ८० वर्षीय संध्या श्यामराव ढोरे यांचा पूरामुळे मृत्यू झाला. हजारीपहाड नाल्यातील पाणी गोठ्यात शिरल्याने गोठ्यात बांधलेली १२ मोठी आणि २ लहान जनावरे मृत पावली. मृत जनावरांमध्ये सहा म्हशी, सहा गायी आणि दोन वासरांचा समावेश आहे.

प्रभावित वस्त्यांतीतील नागरिकांचे स्थानांतरण

नदी तसेच नाल्यांच्या काठावर असलेल्या वस्त्यांमध्ये पाणी शिरल्याने जीवनाश्यक साहित्य व अन्य उपयोगी साहित्य पूर्णत: पाण्यात बुडाल्यामुळे जनजीवन पूर्णत: विस्कळीत झाले. मनपाद्वारे वेळीच धोका ओळखून अशा वस्त्यांमधील नागरिकांचे परिसरातील शाळांमध्ये स्थानांतरण केले. स्थानांतरण केलेल्या नागरिकांना भोजनाचे पॅकेट्स, पाणी तसेच आवश्यक वस्तू, औषध आदींची व्यवस्था करण्यात आली आहे. मनपाद्वारे सुमारे १२ हजार नागरिकांना भोजन पॅकेट्स आणि आवश्यक वस्तू उपलब्ध करून देण्यात आलेल्या आहेत. शहरातील विविध स्वयंसेवी संस्था, हॉटेल्स आणि सेवाभावी व्यक्ती हे सर्व पावसामुळे प्रभावित नागरिकांच्या भोजन व्यवस्थेसाठी पुढे आलेले आहेत.

झाडांची पडझड

मुसळधार पावसामुळे शहरात अनेक ठिकाणी झाडांची देखील पडझड झाली. बचाव कार्यासोबतच बचाव पथकाद्वारे पडलेली झाडे बाजूला करून नागरिकांना दिलासा देण्याचे मदतकार्य देखील करण्यात आले. मनपाच्या अग्निशमन आणि आणिबाणी सेवा पथकाने दहाही झोनमध्ये २२ ठिकाणी पडलेली झाडे हटविण्याचे कार्य केले. शहरात अनेक ठिकाणी नाल्याच्या भिंती देखील पडलेल्या आहेत. पावसामुळे नागपूर शहरातील दहाही झोनमधील सुमारे ५०० घरे बाधित झालेली आहे.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

आगामी सणानिमीत्त नागपूर शहर पोलीसांचे पथसंचलन संपन्न

Sun Sep 24 , 2023
नागपूर :- गणेशोत्सव २०२३ निमीत्ताने दिनांक २८.०९.२०२३ रोजी होणारे गणेश विसर्जन व ईद ए मिलाद या सणामध्ये निघणाऱ्या मिरवणुकी दरम्यान नागपूर शहरातील शांतता व सुव्यवस्था कायम रहावी या करीता नागपूर शहर पोलीसांचे वतीने दिनांक २३.०९.२०२३ रोजी १६.३० वा. चे सुमारास  पोलीस आयुक्त नागपूर शहर, सह पोलीस आयुक्त नागपूर शहर यांचे प्रमुख उपस्थितीत पोलीस ठाणे तहसिल हद्दीतील सेवासदन चौक येथून पथसंचलनाला […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com