नागपूर :- तब्बल 28 किलोमीटर लांबीचा व्याघ्र सफारी मार्ग या मार्गाच्या सोबतीला काही अंतर हे तोतलाडोह धरणाचे बॅक वॉटर, धरणाच्या पाण्यामुळे ठिकठिकाणी वाहणारे बारमाही झरे, अनेक रंगांचे पंख घेऊन असलेले पक्षी त्यांच्या किलबिलाटासह मधुरतेने घातलेल्या शिळेच्या सोबतीला वाघांची डरकाळी अशी अनुभूती पर्यटकांना घेता येत असल्याने आता पेंच व्याघ्र प्रकल्प आकर्षणाचे केंद्र झाले आहे. एकएक पंजा उचलत पुन्हा त्यांच नजाकतीने पंजाला दुडपून घेत फिरणारे वाघांचे कुटुंब हे येथे पर्यटकांना सहज भेटीला येत असल्याने या व्याघ्र सफारीची उत्सुकता बनेरा सफारी गेटच्या माध्यमातून उपलब्ध झाली आहे.
नागपुरपासून अवघ्या तासाभराच्या प्रवासानंतर बनेरा सफारी गेटच्या मार्गे पेंच व्याघ्र प्रकल्पाला भेट देऊन निसर्गातील हे जैववैविध्य वन्यजीवांसह अनुभवण्यासाठी मोठ्या प्रमाणात पर्यटकांची व्यवस्था व्हावी यादृष्टीने वनविभागाने चपखल नियोजन केले आहे. https://safaribooking.mahaforest.gov.in या संकेतस्थळावर सर्व प्रकारची माहिती व पेंच प्रकल्पात असलेल्या वातानुकूलित रुम्सची सुविधा यांचे बुकींग वनविभागाने उपलब्ध करुन दिले आहे. पेंच व्याघ्र प्रकल्पाचे मिनको पर्यटन संकुल येथे निसर्गाच्या सानिध्यात ही सुविधा आहे. येत्या काही दिवसातच कोलितमारा ते कुंवारा भिवसेन सोलर लक्झरी बोटच्या माध्यमातून ही सफारी अधिक रंजक राहिल असे वनविभागाच्या वतीने कळविण्यात आले आहे.
पेंच व्याघ्र प्रकल्पात पर्यटकांना निसर्गाचा सन्मान राखत आपला अनुभव अधिक समृध्द करता यावा यासाठी वनविभागाच्या वतीने विशेष दक्षता घेतली जात आहे. बनेरा सफारी गेट हे पेंच व्याघ्र प्रकल्पातील सर्वाधिक आकर्षक प्रवेशद्वारापैकी एक ठरावे यादृष्टीने नियोजन केले आहे. प्राण्यांना ठिकठिकाणी पानवठे, विश्रांतीस्थान यावर भर दिला जात आहे. सर्व वन्यजीव प्रेमी, छायाचित्रकार, पर्यटकांनी मोठ्या संख्येने या ठिकाणी भेट द्यावी, असे आवाहन वनविभागाने केले आहे.