मुंबई :- पाटण तालुक्यातील काळोली येथे उभारण्यात आलेल्या लोकनेते बाळासाहेब देसाई बहुउद्देशीय कृषी संकुल तालुका बीज गुणन केंद्राच्या पहिल्या टप्प्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. पश्चिम महाराष्ट्रातील उत्तम शेतकरी प्रशिक्षण केंद्र म्हणून लोकनेते बाळासाहेब देसाई बहुउद्देशीय कृषी संकुल नावारूपास येईल, असा विश्वास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केला.
यावेळी आयुष मंत्रालय व आरोग्य व कुटुंब कल्याण केंद्रीय राज्यमंत्री प्रतापराव जाधव, राज्याचे राज्य उत्पादन शुल्क मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री शंभूराज देसाई, कृष्णा खोरे विकास महामंडळाचे उपाध्यक्ष महेश शिंदे, जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी, पोलीस अधीक्षक समीर शेख, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी याशनी नागराजन, कृषी सहसंचालक उमेश पाटील, लोकनेते बाळासाहेब देसाई सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष यशराज देसाई, जिल्हा कृषी अधिकारी भाग्यश्री फरांदे आदी उपस्थित होते.
यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी माती परीक्षण प्रयोगशाळा, धान्य व स्वच्छता प्रतवारी केंद्र, डाळ प्रक्रिया केंद्र, तेल घाणा केंद्र व भात प्रक्रिया केंद्राची पाहणी केली.
जिल्ह्यातील दुर्गम भागात पालकमंत्री शंभूराज देसाई यांच्या संकल्पनेतून १६.३३ हेक्टर क्षेत्रावर काळोली येथे बहुउद्देशीय कृषी संकुल उभारण्यात आले. या बहुउद्देशीय संकुलासाठी जिल्हा वार्षिक योजनेतून ४९८ लक्ष रुपये खर्चास मंजुरी मिळाली असून त्यापैकी ४९१ लक्ष रुपये वितरित करण्यात आले आहेत. या संकुलाच्या माध्यमातून जिल्ह्यातील सर्व तालुक्यातील शेतकऱ्यांना प्रक्षेत्रावर विविध पिकाचे प्रात्यक्षिक स्वरूपात असलेले निवासी प्रशिक्षण, वेगवेगळ्या प्रक्रिया उद्योगांचे प्रशिक्षण आणि माती परीक्षण या सुविधा एकाच ठिकाणी उपलब्ध करुन देण्यात येणार आहेत.
या कृषी संकुलात तालुका बीज गुणन केंद्र काळवली प्रक्षेत्रावर १२.२० हेक्टर लागवडीलायक क्षेत्र असून सध्या या क्षेत्रावर भात, सोयाबीन, ऊस आणि रब्बी ज्वारी या पिकांचे बीजोत्पादन घेतले जाते. पाटण तालुक्यात पिकांच्या लागवडीसाठी पोषक हवामान आहे. येथे भात सोयाबीन, ऊस, भुईमूग, सूर्यफूल या पिकांची लागवड करण्यात येते.
कृषी संकुलामध्ये २०० आसन क्षमता असलेले सुसज्ज शेतकरी प्रशिक्षण केंद्र आहे. या प्रशिक्षण केंद्रामध्ये प्रशिक्षण देण्यासाठी कृषी, उमेद, महिला आर्थिक विकास महामंडळ, ग्रामविकास विभाग यांची शेतकरी तसेच महिला बचत गटासाठी प्रशिक्षणांचे नियोजन करण्यात आले आहे. या प्रशिक्षणाच्या माध्यमातून दरवर्षी सुमारे दहा हजार शेतकरी या कृषी संकुलास भेट देतील. कृषी संकुलामध्ये पीक उत्पन्न वाढीसाठी अत्यंत आवश्यक असलेल्या माती परीक्षण प्रयोगशाळा उभारण्यात आली आहे. याच्या माध्यमातून दुर्गम भागातील शेतकऱ्यांना माती नमुने तपासण्यासाठी जिल्हास्तरावर यावे लागणार नाही. या बहुउद्देशीय कृषी संकुलामध्ये पहिल्या टप्प्यात धान्य प्रतवारी केंद्र, तेलघाणा औणि भात गिरणीचे नियोजन करण्यात आले आहे. या प्रक्रिया केंद्रामध्ये शेतकऱ्यांना भाडेतत्त्वावर धान्याची प्रतवारी करणे भुईमूग, सूर्यफूल इत्यादीचे तेल तयार करणे आणि भात कांडून देणे या सुविधा उपलब्ध आहेत. ही केंद्रे शेतकरी उत्पादक कंपन्या आणि कृषी महाविद्यालयातील विद्यार्थी यांचे मार्फत कार्यान्वित करण्यात येतील. या प्रक्रिया केंद्रांमुळे दुर्गम भागातील युवकांना कृषी प्रक्रियेबाबत माहिती मिळण्यास मदत होणार आहे.
काळोलीच्या बीज गुणन केंद्रावर ऊस संशोधन केंद्र पाडेगाव येथील ऊस प्रात्यक्षिके उपकेंद्राच्या माध्यमातून घेणे प्रस्तावित असून तसा प्रस्ताव महात्मा फुले कृषी विद्यापीठात देण्यात येणार आहे. यामुळे पाटण आणि लगतच्या तालुक्यातील उसाचे उत्पादन वाढण्यासाठी उत्तम बियाणे शेतकऱ्याऱ्यांपर्यंत पोहोचवण्यात येईल.या संकुलाच्या दुसऱ्या टप्प्यामध्ये शेतकरी निवासस्थान, उपहारगृह, शीतगृह या सुविधा प्रस्तावित असून जिल्हा वार्षिक योजनेतून त्यासाठी प्रशासकीय मान्यता मिळाली आहे.