भंडारा :- राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गट ओबीसी सेल महाराष्ट्र प्रदेश तर्फे महाराष्ट्रातील सर्व बहुजनांना संघटित करण्याच्या उद्देशाने येत्या १६ फेब्रुवारी २०२४ रोजी महा बाईक रॅलीचे आयोजन करण्याचा निर्णय घेण्यात आला असून सदर रॅली महाराष्ट्रातील ४८ मतदार संघातून ७२ विधानसभा क्षेत्रामध्ये २५०० किमी प्रवास करणार आहे. सदर रॅलीमध्ये प्रमुख पाहुणे म्हणून, जितेंद्र आव्हाण, रोहित पवार व राज राजापूरकर आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत.
या बाईक रॅली प्रवासा दरम्यान ४८ कॉर्नर सभा, ६ महामेळावे आयोजित करण्यात येतील. रॅलीचे शुभारंभ भंडारा येथून गोंदिया मतदार संघापर्यंत होईल. सदर रॅलीमध्ये सर्व सेलचे पदाधिकारी सहभाग घेतील. रॅलीदरम्यान भंडारा, तुमसर, तिरोडा याठिकाणी कॉर्नर सभा घेण्यात येईल तसेच पाच तालुक्यातून बाईक रॅलीचा प्रवास असणार आहे. राकाँ पक्ष प्रमुख शरदचंद्र पवार यांनी बहुजनांना दिलेला योगदान पाहता त्याचे फलित बहुजनांपर्यंत पोहचविण्याचे कार्य या रॅलीच्या माध्यमातून करण्यात येणार आहे.
बहुजनांनी ५० वर्षाच्या कारकिर्दीत जे योगदान दिले त्याचे सार्थक म्हणून बहुजन जुडेगा, देश बढेगा हा नारा घेऊन महाराष्ट्रातील सर्व जनतेला आवाहन करीत पवार साहेबांच्या झेंड्याखाली महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस ओबीसी सेलची निर्मिती करण्यात आली आहे. पवार साहेबांनी आपल्या कारकिर्दीत अनेकांना नेते बनविले, आमदार, खासदार बनविले परंतु आज तेच स्वत:च्या स्वार्थापोटी आपले कर्तव्य विसरुन गेलेत. असे पत्रपरिषदेत राकाँ शरदचंद्र पवार गटाचे जिल्हाध्यक्ष किरण अतकरी यांनी सांगितले.
ते पुढे म्हणाले की भंडारा-गोंदिया लोकसभा मतदार संघाची जबाबदारी मी घेतली असून याकरीता कर्तव्यपणाला लावून जबाबदारीला पार पाडणारच असे आवर्जुन सांगितले. यावेळी अतकरी यांनी सदर महारॅलीला प्रचंड प्रतिसाद मिळेल असे आश्वासन दिले. या रॅलीमध्ये महिला आरक्षण, मराठी विद्यापीठातील आरक्षण, अल्पसंख्यांकासाठी निर्णय, महाराष्ट्रातील प्रत्येक घटकासाठी अमुल्य अशी बहुजनांमध्ये जागृती करण्यात येत आहे. तरी सर्व पत्रकार मित्रांनी बहुजन जुडेगा, देश बढेगा या रॅलीमध्ये उपस्थित राहून देशातील लोकशाही व संविधानच्या रक्षणार्थ एकत्रित येण्याचे आवाहन या पत्रकार परिषदेत करण्यात आले आहे.
या पत्रकार परिषदेत जिल्हाध्यक्ष किरण अतकरी, महासचिव दिलीप सोनूले, विधानसभा अध्यक्ष अजय मेश्राम, ओबीसी सेल अध्यक्ष नितेश मारवाडे तसेच इतर पदाधिकारी उपस्थित होते.