संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी
कामठी :- परमपूज्य डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या चळवळीवर प्रेम करणारे व सामाजिक परिवर्तनाच्या चळवळीमध्ये ज्यांनी हिरीरीने भाग घेतला व या चळवळीत आपल्या सर्वस्व पणाला लावणाऱ्या मधील एक व्यक्तिमत्व व जयभीम नाऱ्याचे जनक म्हणजे कामठीचे बाबू हरदास एल एन (बाबू हरदास लक्ष्मण नगरकर )हे नाव अग्रणी आहे.तसेच 1937 मध्ये नागपूर कामठी मतदार संघातून पहीले निवडून आलेले आमदार म्हणून बाबू हरदास एल एन आहेत.
बाबू हरदास एल एन यांचा जन्म 6 जानेवारी 1904 रोजी झाला .समाजाच्या अयोग्य व जाचक चालीरितीवर आघात, अंधश्रद्धा पासून मुक्तता,लोकशिक्षणासाठी रात्रीची शाळा, वर्तमानपत्र इत्यादी त्यांच्या कार्याची विशेषता होती. डॉ बाबासाहेब आंबेडकरांच्या चळवळीतील विदर्भविर बाबु हरदास एल एन यांनी अस्पृश्य समाजामध्ये जनजागृती करून नवचैतन्य निर्माण करण्याचे कार्य केले.व त्यासाठी अहोरात्र कष्ट केले. सण 1920 साली छत्रपती शाहू महाराजांच्या विनंती वरून जेव्हा डॉ बाबासाहेब आंबेडकर नागपूर ला प्रथमता आले तेव्हा त्यांनी समाजप्रमुखांची बैठक बोलावून सहभोजन घडवून आणले व तेव्हापासून वैचारिक मंथन सुरू झाले.बाबू हरदास यांचा सन 1920 मध्ये विवाह झाला व सन 1921 मध्ये हरदास बाबूंचे वडील लक्ष्मणराव नगरकर यांचे निधन झाले त्यानंतर बाबूंनी समाजासाठी सर्वस्व अर्पण करण्याचा निर्णय घेतला.साप्ताहिक ‘महारठठा ‘या वर्तमान पत्राचे संपादक झाले .महिला आश्रमची स्थापना करून स्त्रींयाना गृहजीवणातील प्रशिक्षण दिले. सन 1922 मध्ये लिफ्टनं चहा कंपनीमध्ये हरदास बाबूंनी नोकरी केली.1923 मध्ये आरक्षणाचे जनक राजश्री छत्रपती शाहू महाराजाची भेट घेतली व वऱ्हाडाचे गव्हर्नर जनरल बेरी.डिग यांना कामठीला बोलाविले.1924 मध्ये मंडईचा विरोध करून ‘मंडई महात्म’हे पुस्तक प्रकाशित केले आणि संत चोखामेळा वाचनालयाची स्थापना पेरकी चाळेत केली आणि आज त्या ठिकाणी कामठी ची प्रसिद्ध गोयल टॉकीज आहे.1925-26 मध्ये स्वतंत्र अस्तित्वाची प्रेरणा घेऊन रात्रीच्या शाळा स्थापन केल्या. 1927 मध्ये रामटेक मंदिर प्रवेशासाठी संघर्ष करून अंबाळा तळ्याजवळ मंदिराची स्थापना केली.1928मध्ये संत चोखामेळा ‘साप्ताहिक महारठठा विशेषांक काढला.1929-30या कालावधीत नागपूर जिल्हा कॉन्सिलच्या निवडणुकीकरिता राखीव जागेवरून हरदास बाबूंनी फॉर्म भरला .बांबूच्या विरोधात टी सी साखरे यांनी सुद्धा फॉर्म भरले ही गोष्ट कळताच बाबूंनी स्वतःचा फॉर्म मागे घेऊन टी सी साखरेंना बिनविरोध निवडून आणले.1930 ला ऑल इंडिया डिप्रेस क्लासेस फेडरेशन च्या सहसचिवपदी हरदास बाबूची निवड करण्यात आली. व 8 ऑगस्ट 1930 ला कामठी येथील खंडूजी थिएटर जेथे आज श्री टॉकीज आहे तिथे ऍड रावसाहेब रामचंद्र फुले यांच्या अध्यक्षतेखाली डॉ बाबासाहेब आंबेडकरांचा सत्कार करण्यात आला व त्याचवेळी मध्यप्रदेश बिडी मजदूर संघाची स्थापना करण्यात आली.
अकोला येथे 1933 ला दलित परिषद बाबू हरदास यांच्या अध्यक्षतेखाली सुरू होती. अध्यक्षीय भाषण करण्यासाठी बाबू हरदास उठले व त्याच क्षणी त्यांच्या हातात एक टेलिग्राम पडला तो टेलिग्राम हातात घेऊन बाबूंनी भाषणास सुरुवात केली. अध्यक्षिय भाषण संपल्यावर टेलिग्राम चे वाचन केले .वाचन केल्यावर समजले की बाबूंच्या मुलाचे निधन झाले. बाबूंना काही सुचेना ! बाबू हरदास या दुःखाचे पहाड पचवून स्तब्ध राहीले.परिषदेचे संयोजक अंसूजी खंडारे यांनी विनवणी केली की बाबू कामठीला परत जा परंतु बाबू परिषद सोडून गेले नाही .
सन 1937 मध्ये मध्यप्रदेश विधिमंडळासाठी डॉ बाबासाहेब आंबेडकरानी संस्थापित ‘स्वतंत्र मजूर पार्टी चे’एकूण सात उमेदवार निवडून आले ज्यांमध्ये नागपूर कामठी चे हरदास लक्ष्मण नगरकर,भंडाऱ्याचे राघोबाजी घोडीचोर,चंद्रपूर चे देवाजी भिवाजी खोब्रागडे,यवतमाळ चे डी के भगत,वर्धाचे दशरथ पाटील, उमरेड चे सीताराम पाटील, चिंडवाडाचे जांभुळकर चा समावेश होता. यातून नागपूर कामठी निर्वाचन क्षेत्रातून बाबू हरदास एल एन 2100 मतांनी निवडून आल्याबद्दल श्रीमंत गौरीशंकर गजबे यांच्या अध्यक्षतेखाली बाबू हरदास यांचा नागरी सत्कार करण्यात आला होता. यानंतर बाबूंना अनेक संस्थांचे पदाधिकारी ,हजारो बांधव भेटायला आले असता कोणी नमस्कार करीत तर कोणी दिनबंधु म्हणत होते. एकदा बाबू हरदास व त्यांचे सहकारी मित्र गौरीशंकर गजबे सहज फिरायला गेले असता रस्त्याने चालता त्याच दिशेने एक मुस्लिम समाजाची व्यक्ती जात होती त्या दोघांनी एक दुसऱ्यांना बघून ‘अस्सलाम वालैकुम’म्हटले तर यावर दुसऱ्याने उत्तरात वालेकुम अस्लाम म्हटले.यावरून इतराप्रमाणे आपल्या बांधवांना देखील नमस्कार करण्याकरिता एखादा सर्वसामान्य नमस्कार असावा या विचाराअंती ‘जयभीम’हा नारा त्यांना आवडला .एका दलित बांधवाने दुसऱ्या दलित बांधवांना नमस्कार करावयाचे झाल्यास जयभीम म्हणावे तर प्रति उत्तरात दुसऱ्याने पहिल्या दलित बांधवास ‘बलभीम’म्हणावे .या नाऱ्याचा सर्वत्र प्रचार प्रसार करण्यासाठी ‘भीम विजय संघा’ची स्थापना केली. जयभीम नारा दलितांचा स्वाभिमान व शक्तीचे प्रतीक आहे म्हणूनच बाबू हरदास यांना जयभीम नाऱ्याचे जनक म्हटल्या जाते.बाबू हरदास यांचा सार्वजनिक जीवनाचा अत्यल्प प्रवास 12 जानेवारी 1939 ला पहाटे 3 वाजता अस्पृश्याना प्रकाश देणारा हा दीप विझून गेला.बाबू हरदास यांनी जगाचा अखेरचा निरोप घेतला असला तरी त्यांची आठवण अजूनही सर्वांच्या स्मरणात आहे.