यवतमाळ :- जागतिक एड्स दिनाचे औचित्य साधून मार्ग हक्काचा, सन्मानाचा घोष वाक्यावर आधारीत जिल्हा एड्स प्रतिबंध व नियंत्रण पथक सामान्य रुग्णालयाच्या वतीने समता मैदान येथून प्रभात फेरीचे आयोजन करण्यात आले होते.
या प्रभातफेरीचे उद्घाटन जिल्हा शल्यचिकित्सक यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ. रमेश मांडण, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. पी.एस. चव्हाण, जिल्हा नेत्रचिकित्सा अधिकारी डॉ.मनोज तगलपल्लेवार, जिल्हा क्षयरोग अधिकारी डॉ.सागर जाधव, जिल्हा स्त्री रुग्णालयाचे वैद्यकीय अधिक्षक डॉ. रवि पाटील, एआरटी केंद्राचे वरिष्ठ वैद्यकीय अधिकारी डॉ.अविनाश बोरीकर, जिल्हा कार्यक्रम अधिकारी प्रिती दास यांच्या हस्ते हिरवी झेंडी दाखवून करण्यात आले.
प्रभातफेरीच्या सुरुवातीला महाजन नर्सिंग महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी पथनाट्याद्वारे एचआयव्ही, एड्स याविषयाबाबत माहिती दिली. नंतर निवासी वैद्यकीय अधिकारी यांच्यासोबत सर्वांनी शपथ घेतली. प्रभात फेरी समता मैदान येथून हनूमान आखाडा, मेनलाईन, बसस्टॅड चौक व परत समता मैदान येथे समारोप झाला. यामध्ये जिल्हा विधी सेवा प्राधीकरण व न्याय विभागाचा सहभाग होता.
परिचर्या प्रशिक्षण केंद्र सामान्य रुग्णालय, महाजन नर्सिंग विद्यालय, वसंतराव नाईक कृषी जैव तंत्रज्ञान महाविद्यालय, अन्न तंत्रज्ञान महाविद्यालय, रुपेशकुमार इंगोले, देवयानी व मातोश्री नर्सिंग महाविद्यालय, गाडे पाटील नर्सिंग महाविद्यालय, सुमित्राबाई ठाकरे नर्सिंग महाविद्यालय व आबासाहेब पारवेकर महाविद्यालयाचे विद्यार्थी सहभागी झाले होते.
प्रभात फेरीमध्ये जिल्हा शल्यचिकित्सक कार्यालयातील अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. कार्यक्रमाचे संचलन व आभार विशाल शेजव यांनी केले. फेरी यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी डाप्कू, आयसीटीसी, एआरटी कर्मचारी व ग्रामीण समस्या मुक्ती ट्रस्ट अंतर्गत सर्व अशासकीय संस्था तसेच जिवनज्योती एड्स प्रतिबंध व प्रबोधन संस्था पुसद तसेच होंडा शोरुम यांचे सहकार्य लाभले. ग्रामीण समस्या मुक्ती ट्रस्टकडून बिस्कीट व पाणी वाटप करण्यात आले व प्रभात फेरीची सांगता करण्यात आली.