– रोहयोंतर्गत लाभार्थी प्राधान्यक्रम यादीची प्रक्रिया
– लाडकी बहीण योजनेच्या अर्ज स्विकृतीची पाहणी
यवतमाळ :- रोहयो कामाच्या प्राधान्यक्रम प्रतिक्षा याद्या तयार करण्यासाठी जिल्ह्यात विशेष ग्रामसभा आयोजित करण्यात आल्या आहे. ग्रामसभेत मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे अर्ज स्विकारण्यात येत आहे. मुख्य कार्यकारी अधिकारी मंदार पत्की यांनी यवतमाळ तालुक्यातील खरद येथे ग्रामसभेला भेट दिली व कामकाजाची पाहणी केली.
महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गत विविध घटकांसाठी लाभार्थी निवडण्याकरीता या विशेष ग्रामसभा घेण्यात येत आहे. आज खरद येथे विशेष ग्रामसभेस पत्की यांनी उपस्थित राहून रोहयोंतर्गत ग्रामपंचायत स्तरावरुन प्रामुख्याने वैयक्तिक सिंचन विहिरी, जनावरांचा गोठा, कुक्कुटपालन शेड, बांबू लागवड, फळबाग लागवड, मोहगणी वृक्ष लागवड, तुती लागवड, वैयक्तिक शेततळे, ढाळीचे बांध, शेत सपाटीकरण विहीर पुनर्भरण, जलतारा या कामाच्या प्राधान्यक्रम बाबत मार्गदर्शन केले.
रोहयोच्या विविध घटकांसाठी लाभार्थ्यांची यादी एकाचवेळी तयार करण्यात येणार असल्याने त्याबाबत नागकरीकांना प्राधान्यक्रम याद्याचे महत्व पटवून दिले. विशेष ग्रामसभेमध्ये शासनाच्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेबाबत नागरीकांना मार्गदर्शन करण्यात आले. मुख्य कार्यकारी अधिकारी मंदार पत्की यांनी स्वतः महिलांकडून योजनेचे अर्ज भरुन घेतले. याकरीता महिलांनाकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.
शासनाचे नारी शक्ती दूत अँप कार्यान्वित झाले असून यावर महिलांना सदर योजनेकरीता अर्ज सादर करता येणार आहे. सदर प्रक्रिया संपुर्ण विनामुल्य आहे. अंगणवाडी केंद्र, ग्रामपंचायत येथे योजनेचे अर्ज उपलब्ध करुन देण्याबाबत निर्देश देण्यात आले. योजनेबाबत बचतगटाच्या सहयोगीनी, सीआरपी आणि वरिष्ठ अधिकारी यांना गावपातळीवर मार्गदर्शन करण्याबाबत पत्की यांनी सूचना केल्या.
ग्रामसभेला गटविकास अधिकारी केशव गडडापोड, सरपंच आनंदराव मेटकर, सहायक गटविकास अधिकारी किशोर गोळे, नरेगाचे विस्तार अधिकारी अरुण भोयर, विस्तार अधिकारी अनिल जगताप, ग्रामपंचायत सचिव पी.आर.मेंढे तसेच गावातील देवानंद काटे. मोहन मेटकर, पी.टी.भगत, तुषार भिसे, ललीत तराळ, ग्रामपंचायत सदस्य, शिक्षक, तलाठी, आरोग्य सेवक, कृषी सहायक, बचत गटाचे सदस्य आदी उपस्थित होते.