– तीन मोबाईल, पर्स जप्त
– सीसीटीव्ही फुटेजच्या मदतीने अटक
नागपूर :- साखर झोपेत असलेल्या प्रवाशाचा मोबाईल चोरी करून क्लॉक रूमच्या कर्मचार्याला विक्रीचा प्रयत्न केला. मध्यवर्ती नागपूर रेल्वे स्थानकावर ही चोरीची घटना घडली. आरपीएफच्या पथकाने सीसीटीव्ही फुटेजच्या मदतीने आरोपीची ओळख पटवून त्याला पकडले. संगीत सिंगमारे (30) रा. भंडारबोडी, बालाघाट असे आरोपीचे नाव आहे. कागदोपत्री कारवाईनंतर त्याला लोहमार्ग पोलिसांच्या सुपूर्द केले.
विजय उनियाल (47) रा. देहरादून असे फिर्यादी प्रवाशाचे नाव आहे. विजय प्लॅटफार्म क्रमांक एकवर साखर झोपेत असताना आरोपी संगीतने त्याचा मोबाईल, बॅग, पर्स आणि 1600 रुपये चोरले. चोरीचा मोबाईल येथील क्लॉक रूमचा कर्मचारी गुड्डू कुमार राजपूत (32) रा. खलाशी लाइन याला विकण्यासाठी सौदा केला. त्यानंतर तो प्लॅटफार्म क्रमांक एकच्या जनरल वेटींग हॉलमध्ये थांबला.
दरम्यान विजयला जाग आली. त्याने मोबाईल चोरीची तक्रार आरपीएफ आणि लोहमार्ग पोलिसांकडे केली. आरपीएफ निरीक्षक आर.एल. मीना यांच्या निर्देशाने आरक्षक अमोल चहाजगुने यांनी सीसीटीव्ही नियंत्रण कक्षात फुटेज तपासले असता आरोपीची ओळख पटली. आरोपीच्या अटकेसाठी निरीक्षक मीना यांनी एक पथक तयार केले. या पथकात विठोबा मरसकोल्हे, आरक्षक अमोल चहाजगुने, आरक्षक धीरज दलाल, आरक्षक रवींद्र जोशी तसेच आरक्षक नीरज कुमार यांचा समावेश होता. सर्वांच्या व्हॉट्स अॅपवर आरोपीचे छायाचित्र होते. जनरल वेटींग हॉलमधून आरोपीला अटक करण्यात आली. पथकाने क्लॉकरुमच्या कर्मचार्यालाही ताब्यात घेतले. दोघांची सखोल चौकशी करून आरोपी संगीतला लोहमार्ग पोलिसांच्या सुपूर्द करण्यात आले. पोलिसांनी त्याच्या विरूध्द गुन्हा नोंदवून अटक केली. त्याच्या ताब्यातून तीन मोबाईल, पर्स आणि रोख रक्कमेसह जप्त केली. मध्य रेल्वेचे वरिष्ठ सुरक्षा आयुक्त आशुतोष पांडे यांच्या मार्गदर्शनात कारवाई करण्यात आली.