नागपूर :- श्री गणेश अथर्वशीर्ष च्या माधमातून भगवान श्री गणेशांच्या चरणी पोहोचत यांचे स्वरूप् असणा-या अखंड आनंदाची प्राप्ती आपल्याला देखील होऊ शकते. जीवनात कोणत्याही परिस्थितीत आपल्या मनस्थितीला शांत ठेवण्याची गुरुकिल्ली आहे. अथर्वशीर्ष, सुखी, समाधानी, प्रसन्न, आनंदी आयुष्याचा राजमार्ग म्हणजे श्री गणेश अथर्वशीर्ष. या दिव्य स्तोत्राचा अर्थ समजून घेऊन त्यानूसार आपली जीवनयात्रा सुनिश्चित केली तर जीवनातील प्रत्येकच दिवस अक्षयतृतीया राहील आणि मोरयाच्या प्रिय चतुर्थ अवस्थेमध्ये आपली चतुर्थी साजरी होईल.” असे विचार सुप्रसिध्द गाणपत्य तत्वज्ञान अभ्यासक विद्यावाचस्पती प्रा. स्वानंद गजानन पुंड यांनी व्यक्त केले.
नागपूर नगरीचे ग्रामदैवत श्री टेकडी गणपती देवस्थानच्या वतीने दिनांक 3 मे ते 9 मे 2024 या कालावधीत आयोजित श्री गणेश अथर्वशीर्ष निरूपण मालिकेच्या समारोप प्रसंगी ते व्यक्त होत होते.
अथर्वशीर्षातील प्रत्येक पदाचा अर्थ उलगडून दाखवल्या नंतर त्यांच्यातील जी अंतर्संगती डॉ. पुंड यांनी स्पष्ट करून सांगितली ती श्रोत्यांनी सर्वाधिक भावली. आजपर्यत हजारो वेळा हे स्त्रोत म्हटले पण त्याचा नेमका अर्थ काय आहे तो आता कळला ही अनेक श्रोत्यांची प्रतिक्रिया निरूपण मालिकेची खरी उपलब्धी ठरली.
याप्रसंगी देवस्थान चे अध्यक्ष विकास लिमये तथा सचिव श्रीराम कुलकर्णी यांच्या हस्ते वक्त्यांचा सपत्निक सत्कार करण्यात आला. कोषाध्यक्ष दिलीप शहाकार सहसचिव अरूण व्यास हे विशेषत्वाने उपस्थित होते.
आभार प्रदर्शनात अनेक वर्षात देवस्थान मध्ये अशा प्रकारची निरूपन मालिका सादर झाली आणि प्रथमच इतक्या मोठया संख्येत श्रोत्यांचा प्रतिसाद लाभला याचा विशेष आनंद व्यक्त करीत पुढील वेळा सभागृह विस्तीर्ण करावे लागणार असे समाधान विश्वस्त अरूण कुलकर्णी यांनी व्यक्त केले.
कमलेश वसानी आणि जयेश वसानी या बंधूंनी या संपूर्ण निरूपण मालिकेचे निःशुल्क चित्रीकरण केले तथा सुनील माधोळकर यांनी ध्ननिक्षेपण व्यवस्था सांभाळली. गणेश मंदिर टेकडीचे सचिव श्रीराम कुलकर्णी यांनी प्रसिद्धी पत्रकात कळविले आहे. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी देवस्थानच्या सर्व पुरोहित तथा कर्मचारी वर्गाने विशेष परिश्रम घेतले.