– डोंगरी येथील थरारक घटना
रामटेक :- रामटेक पोलिस स्टेशन हद्दीत येणाऱ्या तथा तालुक्याच्या रामटेक – मुसेवाडी मार्गावरून अवघ्या ४ ते ५ कि.मी. पच्छीमेस असलेल्या डोंगरी गावामध्ये हॅन्डपंपवर पाणि भरण्याच्या विषयावरून वाद निर्माण झाला. वादाचे रूपांतर मारहाणीत झाले व यातच एका महिलेचा मृत्यू झाला.
ओमेश्वरी शामदयाल शरणांगत वय ४६ असे मृतक महिलेचे नाव असून कैलास शरणांगत वय ३४ असे आरोपीचे नाव आहे. ग्रामस्थांकडुन मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार आज १ नोव्हेंबर रोजी दुपारी साडेतीनच्या सुमारास घरासमोरील हॅन्डपंपवर आरोपी व मृतक महिला एकाच वेळी पाणि भरण्यास आले होते. दरम्यान पाणि भरण्याच्या कारणावरून दोघांमध्ये चांगलाच वाद झाला. कालांतराने वादाचे रूपांतर मारहाणीत झाले. दरम्यान आरोपी कैलास ने लाकडी अथवा लोखंडी दांड्याने महिलेच्या डोक्यावर जबर वार केला. यात ती महिला गंभीर जखमी झाली. तिला पुढील उपचारासाठी कामठी येथील उपजिल्हा रुग्णालयात नेले असता डॉक्टरांनी महिलेला मृत घोषीत केले. घटनेची माहिती मिळताच रामटेक पोलिसांनी घटनास्थळ गाठत आरोपीला अटक केली. पुढील तपास रामटेक पोलीस करीत आहे.