नागपूर, ता. १४ : नागपूर महानगरपालिकेच्या सहकार्याने सॉफ्टबॉल असोसिएशन ऑफ इंडियाद्वारे, महाराष्ट्र राज्य सॉफ्टबॉल संघटनेच्या मान्यतेने भारतीय पुरुष व २३ वर्षाखालील आशियाई सॉफ्टबॉल निवड चाचणी स्पर्धेचा सोमवारी (ता.१४) समारोप झाला.
विभागीय क्रीडा संकुल, मानकापूर मैदानावर झालेल्या समारोपीय कार्यक्रमात जिल्हाधिकारी आर.विमला, माजी आमदार सुधाकर कोहळे, मनपाचे क्रीडा अधिकारी पीयूष आंबुलकर, इन्स्टिट्यूट सायन्सच्या शारिरीक शिक्षण संचालक डॉ.माधवी मार्डीकर, समाजसेवक चंदनसिंग रोटेले, क्रीडा संघटक अजय हिवरकर, प्रवीण मानवटकर, डॉ. सुरजसिंग येवतीकर, डॉ.विवेक शाहु, केतन ठाकरे, विनोद सुरघुसे, निखिल वाहने आदी उपस्थित होते.
यावेळी जिल्हाधिकारी आर.विमला म्हणाल्या, सॉफ्टबॉल हा क्रिकेटला पर्यायी खेळ असून या खेळामधून अनेक खेळाडू पुढे येत नाव लौकीक करीत आहेत ही आनंदाची बाब आहे. आशियाई सॉफ्टबॉल निवड चाचणी स्पर्धेसाठी देशाच्या विविध भागातून नागपूर शहरात खेळाडूंनी उपस्थिती दर्शविली. खेळाडूंनी स्पर्धेदरम्यान आपले कौशल्य सिद्ध करण्याचा प्रयत्न केला. यामध्ये यश प्राप्त झालेल्या खेळाडूंची आशियाई स्पर्धेसाठी निवड होणार आहे. या खेळाडूंनी आशियाई स्पर्धेमध्ये आपल्या उत्कृष्ट कामगिरीद्वारे देशाचे लौकीक करावे तसेच निवड न झालेल्या खेळाडूंनी निराश न होता आपली कामगिरी उंचावण्यासाठी प्रयत्न करावे, असा सल्ला देत त्यांनी सर्व खेळाडूंचे अभिनंदन केले व त्यांना पुढील स्पर्धांसाठी शुभेच्छा दिल्या.
याप्रसंगी गतवर्षी आंतरराष्ट्रीय स्तरावर उत्कृष्ट कामगिरी करणा-या देशाच्या विविध भागातील खेळाडूंचा जिल्हाधिका-यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
आशियाई सॉफ्टबॉल निवड चाचणी स्पर्धेसाठी भारतातील विविध राज्यातून आंतरराष्ट्रीय, राष्ट्रीय स्तरावर प्राविण्यप्राप्त उत्कृष्ट प्रदर्शन केलेल्या सॉफ्टबॉल खेळाडूंनी सहभाग घेतला होता.
सदर निवड चाचणीमध्ये सहभागी होउन आशियाई सॉफ्टबॉल स्पर्धेत भारताचे प्रतिनिधित्व करण्यासाठी खेळाडूंनी आपल्या कौशल्य व क्षमतांची परीक्षा दिली. २३ वर्षाच्या खालील पुरुष आशियाई स्पर्धा सिंगापूरमध्ये होणार असून या स्पर्धेतील पहिले दोन संघ अर्जेंटिनामध्ये ऑक्टोबर महिन्यात होणाऱ्या विश्वचषकाच्या स्पर्धेसाठी पात्र ठरणार आहेत. तर वरिष्ठ गट पुरुष आशियाई स्पर्धा जपानमध्ये होणार असून त्यातून पात्र होणारे संघ न्यूझीलंडला नोव्हेंबर महिन्यात विश्वचषक स्पर्धा खेळतील.
या निवड चाचणीसाठी भारतीय सॉफ्टबॉल संघटनेचे महासचिव एल.आर. मौर्य, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. प्रविण अनावकर, महाराष्ट्र संघटनेचे सचिव डॉ. प्रदिप तळवेलकर तसेच तज्ञ निवडकर्ता मंडळी उपस्थित होते.