फळबाग योजनेलाही मिळणार शंभर टक्के अनुदान, विभागात ९०० हेक्टर क्षेत्रावर फळबाग लागवड

नागपूर :-विदर्भात संत्रा, मौसंबी, आंबा, पेरु, सिताफळ, आवळा आदी सोळा प्रकाराचे फळपिक घेण्यासाठी भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजना शेतकऱ्यांना वरदान ठरत आहे. पारंपारिक शेतीला पर्याय तसेच रोख उत्पादन देणारी फळबाग लागवड करणे शेतकऱ्यांना सुलभ व्हावे यासाठी अर्थसंकल्पात दहा हजार चारशे पन्नास लाख निधीची तरतुद राज्यशासनाने केली आहे. नागपूर विभागात या योजनेअंतर्गत सर्वसाधारण तसेच अनुसूचित जाती प्रवर्गातील सुमारे हजार शेतकऱ्यांनी योजनेचा लाभ घेतला आहे.

भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजना राज्यातील सर्व जिल्ह्यात राबविण्यात येत असुन या योजनेअंतर्गत शंभर टक्के अनुदानावर सोळा बहुवार्षिक फळपिकांचा समावेश करण्यात आला आहे. शेतकऱ्यांना आवश्यकतेनुसार तसेच भौगोलिक परिस्थितीनुसार कृषि विद्यापीठाने शिफारस केलेल्या कलमांची तसेच रोपांची लागवड करण्याची मुभा दिली आहे. त्यामुळे विदर्भातील संत्रा, मोसंबी, आंबा, कागदी लिंबु, पेरु, आवळा, सिताफळ आदी फळबाग लावणे सुलभ झाले आहे. नागपूर विभागातील सर्वसाधारण तसेच अनुसूचित जाती प्रवर्गातील सुमारे १ हजार २८ शेतकऱ्यांनी ८९७ हेक्टर क्षेत्रात विविध प्रजातीच्या फळझाडांची लागवड केली आहे. यासाठी १ कोटी ४१ लाख ५९ हजार रुपयांचे अनुदान शासनाने मंजुर केले आहे.

भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजनेअंतर्गत विभागात मागील वर्षी फळबागेची लागवड नागपूर जिल्ह्यात ६२३ हेक्टरवर करण्यात आली. वर्धा जिल्ह्यात २०२ हेक्टर, भंडारा जिल्ह्यात १४ हेक्टर, गोंदिया जिल्ह्यात २६ हेक्टर तर चंद्रपूर जिल्ह्यात सरासरी ३०.७६ हेक्टर क्षेत्रात फळबाग लागवड झाली आहे. फळबाग लागवड करण्याऱ्या शेतकऱ्यांना अनुदान उपलब्ध झाले असुन सरासरी ८७ लाख रुपयाचे अनुदान वितरित झाले आहे.

असा मिळेल लाभ

फळबाग लागवडीकरिता किमान ०.2० हेक्टर ते कमाल 6 हेक्टरपर्यत लाभार्थी इच्छेनुसार एका पेक्षा जास्त फळपीके लागवड करु शकतात. महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण हमी योजनेमध्ये पात्र असणाऱ्या शेतकऱ्यांनी दोन हेक्टर क्षेत्रापर्यंत लाभ घेतल्यानंतर उर्वरित क्षेत्रासाठी या योजनेचा लाभ घेता येईल.

फळबाग लागवड योजनेमध्ये शेतकऱ्यांना आवश्यकतेनुसार सर्व फळपिकांचे कलमे व रोपांची लागवड करता येईल. कृषी हवामान क्षेत्रास अनुकूल असणाऱ्या व कृषी विद्यापीठाने शिफारस केलेली कलमे लागवड करण्याची मुभा देण्यात आली आहे.

फळबाग योजना राज्यशासनाच्या शंभर टक्के अनुदानावर असल्यामुळे खड्डे खोदणे, कलमे व रोपांची लागवड करणे, पीक संरक्षण, नांग्या भरणे तसेच ठिंबक सिंचनाव्दारे पाणी देण्यासाठी राज्यशासन शंभर टक्के अनुदान देणार आहे. शेतकऱ्यांनी यासाठी स्वखर्चाने जमीन तयार करणे, आंतरमशागत करणे, काटेरी झाडाचे कुंपन करणे तसेच शेणखत, सेंद्रीय खत मिश्रणाने खड्डे भरणे, रासायनिक खत देणे हा खर्च स्वखर्चाने करावयाचा आहे.

अर्ज करायाची पध्दत

भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजनेसाठी शेतकऱ्यांनी महा-डीबीटी पोर्टलच्या संकेत स्थळावर अर्ज करावयाचा आहे. या अर्जासोबत शुल्क व जीएसटी मिळून 23 रुपये 60 पैसे शुल्क ऑनलॉइन भरावयाचे आहे. अर्जासोबत सातबारा, आठ-अ नुसार क्षेत्र, सर्वे नंबर, गावाचे नाव आदी माहिती ऑनलॉइन भरायची आहे. लाभार्थांची निवड तालुका पातळीवर संगणकीय सोडतीव्दारे करण्यात येणार आहे. निवड झालेल्या शेतकऱ्यांना मोबाईलवर कळविण्यात येणार आहे. यासंदर्भात तालुका कृषी अधिकारी यांच्याकडुन अधिक माहिती उपलब्ध होणार आहे.

विदर्भातील शेतकऱ्यांनी भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजनेअंतर्गत संत्रा, मोसंबी, आंबा, कागदी निंबु, पेरु, सिताफळ, आवळा, फणस, चिंकु आदी सोळा बहुवार्षिक फळपिकांचा लागवडीला प्राधान्य देऊन पारंपारिक पिकांऐवजी बाजारपेठेच्या मागणीनुसार फळ लागवड करावी.

 -अनिल गडेकर

  1. @ फाईल फोटो
Email Us for News or Artical - [email protected]
WP Twitter Auto Publish Powered By : XYZScripts.com