संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी
– गतिरोधक बसविण्याची मागणी
कामठी :- कामठी पोलीस स्टेशन हद्दीत येणाऱ्या विश्वविख्यात ड्रॅगन पॅलेस टेम्पल कडे जाणाऱ्या महामार्गावर शाळा, महाविद्यालय,औद्योगिक प्रशिक्षण संस्था असून या मार्गाहून नवीन कामठी परिसरातून येणाऱ्या नागरिकांसह शालेय तसेच महाविद्यालयीन विद्यार्थ्यांची रेलचेल दैनंदिन मोठ्या प्रमाणात असते त्याचबरोबर ड्रॅगन पॅलेस टेम्पल ला भेट देणाऱ्या नागरिकांचीही संख्या मोठ्या प्रमाणात आवागमन करीत असतात.मात्र या मागावर वाहतूक पोलिसांसह स्थानिक पोलिसांचे कुठलेही नियंत्रण नसल्याने या मार्गाहून वाळूने लादून भरलेले तसेच इतर जड वस्तूची वाहतूक जड वाहनाने होत असून जड वाहने सुसाट वेगाने धावत आहेत.नुकत्याच मागिल महिन्यात भरधाव ट्रकने दुचाकीला दिलेल्या धडकेत एका 18 वर्षीय विद्यार्थ्यांचा जागीच मृत्यु झाला तर दुसऱ्या विद्यार्थ्याला कायमचे अपंगत्व आले आहे.या मार्गाहून सुसाट वेगाने धावत असलेल्या वाहनामुळे शालेय तसेच महाविद्यालयात जाणाऱ्या विद्यार्थ्यांना जीव मुठीत घेऊन ये जा करीत असल्याने विद्यार्थ्याना नाहक त्रास सहन करावा लागत आहे.करिता ड्रॅगन पॅलेस टेम्पल च्या स्वागत द्वार पासून ते भोयर कॉलेज वळण मार्गा पर्यंत ठिकठिकाणी गतिरोधक तसेच सी सी टीव्ही कॅमेरे लावण्याची मागणी स्थानिक नागरिकासह येथील प्रोग्रेसिव्ह मूव्हमेंट तसेच डॉ बाबासाहेब आंबेडकर पुतळा परिसर सौंदर्यीकरण समितीच्या वतीने करण्यात आले आहे.
मागील काही महिन्यापासून रमानगर रेल्वे उडान पुलाचे कामे प्रगतीपथावर असल्याने या मार्गावरील वाहतूक दाराना ड्रॅगन पॅलेस टेम्पल मार्गे ये जा करावी लागते ज्यामुळे या मार्गाहुन वाहतूक दारांची रेलचेल वाढली आहे.तसेच या मार्गाहून वजनदार तसेच क्षमतेपेक्षा जास्त वाहतूक असलेली वाहने धावत असल्याने या मार्गावर दैनंदिन किरकोळ अपघात होत असतात तर नुकतेच झालेल्या अपघाती मृत्यूच्या घटनेने सर्वांचे जीव हादरले आहेत तेव्हा अशा घटनेची पुनरावृती न व्हावी यासाठी स्थानिक पोलीस विभागाने गांभीर्याची भूमिका घेत ड्रॅगन पॅलेस टेम्पल स्वागत द्वार ते भोयर कॉलेज टी पॉईंट मार्गा पर्यंत जागोजागी सी सी टीव्ही कॅमेरे तसेच गतिरोधक लावण्यात यावे अशी मागणी प्रोग्रेसिव्ह मूव्हमेंट चे संयोजक राजेश गजभिये, सुमित गेडाम,प्रमोद खोब्रागडे,उदास बन्सोड, कोमल लेंढारे,मंगेश खांडेकर,गीतेश सुखदेवें, विकास रंगारी, आनंद गेडाम,राजन मेश्राम,मनोज रंगारी, रायभान गजभिये, अनुभव पाटील, दिपंकर गणवीर,सुभाष सोमकुवर आदींनी केले आहे.