वास्तविक ज्या काही बातम्या दाखवल्या जात आहेत किंवा येत आहेत त्या बातम्यांमध्ये काही तथ्य नाही – अजित पवार

आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचेच आहोत आणि राष्ट्रवादीतच राहणार आहोत…

काही बातम्या पसरवल्या जात आहेत त्या जाणीवपूर्वक पसरवल्या जात आहेत; बाबांनो, काही काळजी करू नका; पक्षाच्या कार्यकर्त्यांना आवाहन…

बोलणार्‍यांची बातमी देण्याऐवजी अजित पवार का बोलले नाही, ‘अरे एवढे प्रेम का ऊतू जातेय माझ्यावर’…

‘अरे बाबांनो… ‘ध’ चा ‘मा’ करु नका ना… जर काही झाले तर मीच सांगेन ना तुम्हाला… दुसर्‍या कुणाच्या ज्योतिषाची गरज नाही …

मुंबई :- कारण नसताना माझ्याबद्दल किंवा माझ्या सहकारी आमदारांबद्दल गैरसमज निर्माण करण्याचे काम जाणीवपूर्वक वेगवेगळ्या ठिकाणी होताना दिसत आहे. वास्तविक ज्या काही बातम्या दाखवल्या जात आहेत किंवा येत आहेत त्या बातम्यांमध्ये काही तथ्य नाही अशी स्पष्ट भूमिका राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी पत्रकार परिषदेत मांडली.

गेले काही दिवस माध्यमातून येत असलेल्या उलटसुलट बातम्यांवर आज विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी आपली भूमिका मांडत माध्यमांतील सूत्रांची हवाच काढून टाकली.

आपण सातत्याने माझ्याबद्दलच्या बातम्या पसरवत आहात त्यामध्ये यत्किंचितही तथ्य नाही. माझ्याकडे ४० आमदारांच्या सह्यांचे पत्र असल्याचे दाखवले परंतु अशा सह्या घेण्याचे कारण नाही. आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचेच आहोत आणि राष्ट्रवादीतच राहणार आहोत त्यामुळे या बातम्यांना कुठलाही आधार नाही असेही अजित पवार यांनी स्पष्ट केले.

वेगवेगळ्या चॅनेलवर इतर राजकीय पक्षाचे नेते आपली मते व्यक्त करत आहेत त्यांनी ते काय व्यक्त करावे तो त्यांचा अधिकार आहे मात्र मंगळवार, बुधवार आमदारांच्या बैठका असतात. आमचे अनेक आमदार मंत्र्यांकडे किंवा मंत्रालयात कामाच्या निमित्ताने येत असतात. आज जे आमदार आले होते ते माझ्याकडे मी इथे आहे म्हणून भेटायला आले होते. ती नेहमीची पध्दत आहे यामध्ये वेगळा अर्थ काढू नका. त्यामुळे हे जे आमदार भेटले तुम्ही दाखवत आहात. त्याच्यातून त्यांच्याबद्दल राष्ट्रवादी काँग्रेसचा सर्वसामान्य कार्यकर्ता आहे जो आमच्या पक्षाचा कणा आहे तोही संभ्रमावस्थेत जातो त्या सगळ्यांना सांगायचे आहे बाबांनो, काही काळजी करू नका आदरणीय पवारसाहेबांच्या मार्गदर्शनाखाली, नेतृत्वाखाली पक्षाची स्थापना झालेली आहे. पक्षात अनेक चढउतार आले. राजकारणात सत्ता होती, कधी सत्ता नव्हती परंतु ज्या काही बातम्या पसरवल्या जात आहेत त्या जाणीवपूर्वक पसरवल्या जात आहेत असे आवाहनही अजित पवार यांनी यावेळी केले.

आज महाराष्ट्रातील जनतेच्या पुढे महत्वाचे प्रश्न आहेत. त्या महत्वाच्या प्रश्नावरुन लक्ष दुसरीकडे वळवण्याचा प्रयत्न (बेरोजगारी, महागाई, अवकाळी पाऊस) त्यावरुन लक्ष वळवले जात आहे. ७५ हजार पदांची भरती करण्यात येणार होती ती भरती अजून होत नाहीय. कापूस, कांदा शेतकरी हैराण झाला आहे. मुख्यमंत्र्यांनी दौरा केला त्यांचे त्यांनी काम केले. त्यांचे ते कर्तव्य होते परंतु दौरा केल्यानंतर तातडीची मदत केली पाहिजे होती ती मदत होताना दिसली नाही. बारदाने नाहीत म्हणून खरेदी केंद्रांचे काम बंद पडले हे काय उत्तर झाले का? असा संतप्त सवाल करतानाच बारदाने गोळा करण्याचे किंवा उपलब्ध करून देण्याचे काम सरकारचे आहे. याकडे लक्ष द्यायला हवे त्याकडे लक्ष नाही असे खडेबोलही अजित पवार यांनी सरकारला सुनावले.

सरकारी बंगला मिळाला आहे त्याच्या बाहेर कॅमेरे लावता, अरे काय चाललंय तुमचं… तिथे बाहेर कॅमेरे लावून मी बोलणार आहे का? तुमच्याशी मला बोलायचं असेल तर पार्टी कार्यालय किंवा विधानभवन परिसरात बोलेन परंतु आपण सभ्यता पाळली पाहिजे असेही अजित पवार यांनी ठणकावून माध्यमांना सांगितले.

दोन्ही (प्रिंट आणि इलेक्ट्रॉनिक) माध्यमांना विनंती, या कुठल्याही गोष्टींमध्ये तथ्य नाही. नुसते अंदाज व्यक्त करत आहात. कोण अंदाज व्यक्त करते आहे माहीत नाही. तुम्हाला प्रतिज्ञापत्र करुन देऊ का? असे काही पत्रकारांना सुनावल्याचेही यावेळी अजित पवार यांनी सांगितले. आमच्यावर अशापध्दतीची वेळ तुम्ही आणली आहे. हे बरोबर नाही असेही अजित पवार यांनी माध्यमांना बजावले.

सुप्रीम कोर्टाचा काय निकाल येईल तो येईल आम्ही महाविकास आघाडीच्या सभा सुरू केल्या आहेत. नागपूरमध्ये बाळासाहेब थोरात बोलले नाही त्यांची बातमी नाही. सभांमध्ये प्रत्येक पक्षाचे दोन नेते वेगवेगळ्या सभांमध्ये बोलणार असे महाविकास आघाडीत ठरवण्यात आले आहे. बोलणार्‍यांची बातमी देण्याऐवजी अजित पवार का बोलले नाही, ‘अरे एवढे प्रेम का ऊतू जातेय माझ्यावर’ हे काही आहे ते बरोबर नाही असे स्पष्टच माध्यमांना अजित पवार यांनी सुनावले.

आमच्या सभा तुम्ही लाईव्ह दाखवता त्याबद्दल धन्यवाद परंतु असं जे काही काम सुरू केले आहे आणि विपर्यास करायला सुरुवात केली आहे. दुसरं एक ट्वीट दाखवायला सुरुवात केली. अजित पवार यांच्या ट्वीटरवरुन पक्षाचे चिन्ह हलवले माझ्या ट्वीटमध्ये उपमुख्यमंत्री असताना दाखवलं ते उपमुख्यमंत्री पद गेल्यावर काढले बाकीचे आहे तसे आहे. त्यातून गैरसमज करुन घेतला गेला. तुम्हीच म्हणता झेंडा काढला… ‘झेंडा काय कपाळावर लावून फिरू का?’ ‘अरे बाबांनो…’ध’ चा ‘मा’ करु नका ना… जर काही झाले तर मीच सांगेन ना तुम्हाला… दुसर्‍या कुणाच्या ज्योतिषाची गरज नाही आणि दुसरीकडून बातम्याही काढायची गरज नाही. आमच्या मनात असा कुठलाही विचार नाही, चर्चाही नाही. कुणीतरी बातम्या पेरण्याचे काम विघ्नसंतोषी लोक करत असतील मी माझ्या पक्षाचे म्हणत नाही. माझ्याबद्दल आकस असणारे माझ्या पक्षात कुणी नाही पक्षाबाहेरचे आहेत असेही अजित पवार म्हणाले.

पक्षाच्या बाहेरचे प्रवक्ते राष्ट्रवादीचे प्रवक्ते झाल्यासारखे झाले आहेत त्यांना कुणी अधिकार दिला आहे कुणास ठाऊक… हे जेव्हा मविआची बैठक होईल तेव्हा विचारणार आहे असे स्पष्ट करतानाच तुम्ही ज्या पक्षाचे प्रवक्ते आहात तर त्या पक्षाचे सांगा तुमच्या पक्षाचे मुखपत्र आहे त्याबद्दल बोला. तुम्ही आम्हाला कोट करून फलान झालं सांगू नका. आम्ही आमची भूमिका मांडायला खंबीर आहोत. आमचे वकीलपत्र दुसर्‍यांनी घेण्याची गरज नाही. त्यांनी त्यांची भूमिका मांडावी आमची भूमिका मांडण्याकरता आमच्या पक्षाचा प्रवक्ता आणि नेते मजबूत आहेत असेही अजित पवार यांनी खडसावून सांगितले.

आता या गोष्टींना पूर्णपणे थांबवा… आता त्याचा तुकडा पाडा… कारण नसताना गैरसमज निर्माण करुन देऊ नका… कोणत्याही सह्या झालेल्या नाहीत… आम्ही परिवार म्हणूनच काम करतोय… उद्यापण परिवार म्हणूनच काम करत राहणार आहोत… पण जी संभ्रमावस्था आणि गैरसमज निर्माण करुन देण्याचे चालले आहे आणि त्यातून पुन्हा – पुन्हा प्रश्न विचारले जात आहेत. आम्ही पण माणूस आहोत. मी हाडामांसाचा माणूस आहे. आमचीही कधी – कधी सहनशीलता संपते आमच्याही सहनशीलतेचा अंत होऊ देऊ नका अशीही विनंती अजित पवार यांनी केली.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

रोजा मनुष्याला संयम आणि त्यागाची शिकवण देतात-माजी मंत्री आमदार सुनील केदार..

Wed Apr 19 , 2023
संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी  कामठी ता प्र 19 :- रमजान च्या पवित्र महिन्यांमध्ये मुस्लिम बांधवाद्वारे रोजाच्या माध्यमातून उपवास केले जातात. रोजा मुस्लिम बांधवांना संयम,त्याग,मनशांती बहाल करतात त्याद्वारे समाजामध्ये मुस्लिम बांधव आपल्या वर्तणुकीतून एक आदर्श निर्माण करीत असतात त्यामुळे रमजान च्या पवित्र महिन्याला एक अनन्यसाधारण महत्व प्राप्त झाले आहे.तर रमजान चे उपवास म्हणजे रोजा मनुष्याला संयम आणि त्यागाची शिकवण देतात असे […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com