नागपूर :- येत्या 2 वर्षात भारतीय उद्योगक्षेत्रातील महत्वाचा असा लॉजिस्टिक खर्च 2 टक्क्यांवर आणण्याचे सरकारचे प्रयत्न असून आर्टिफिशिअल इंटेलिजन्स द्वारे भारतीय उद्योगातील लॉजिस्टिक खर्च,पॅकेजिंग,उत्पादन, वेळेवर वितरण आणि उत्पादन व सेवेचा पुरवठा यामधे महत्त्वाचे बदल होऊन भारतीय उद्योगक्षेत्र जागतिक स्तरावर आपली वेगळी अशी ओळख निर्माण करतील असे प्रतिपादन केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी केले. इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मटेरीयल मॅनेजमेंट, नागपूर शाखेतर्फे आयोजित ‘रेवॉल्युशनिंग सप्लाय चेन विथ आर्टिफिशियल इंटेलिजन्स’ या परिषदेला ते संबोधित करत होते.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मार्गदर्शनाखाली भारताला जगातली तिसरी सर्वात मोठी आर्थिक व्यवस्था बनवण्याबरोबरच आत्मनिर्भर भारत बनवणे आपले उद्दिष्ट आहे यासाठी तंत्रज्ञानाची योग्य निवड तिचा योग्य वापर आणि समाजातील प्रत्येक घटकाला त्याचा होणारा फायदा गरजेचे आहे. भारतात तरुण वर्गाची संख्या ही लक्षणीय अशी असून हा तरुण वर्ग भारतीय अर्थव्यवस्थेत महत्त्वाची भूमिका पार पाडणार आहे.
भारतीय उद्योगाला आपली वितरण प्रणाली अजून विकसित करून वेळेला सर्वधिक महत्व या तत्त्वाला प्राथमिकता दिली पाहिजे. कालबद्ध वितरण उत्तम पॅकेजिंग लॉजिस्टिक आणि साठवण्याची क्षमता व सर्वच घटकांवर उद्योगविश्वाने लक्ष देणे गरजेचे आहे, असे गडकरींनी याप्रसंगी नमुद केले.
उत्पादन वितरण मालपुरवठा या क्षेत्रामध्ये आर्टिफिशियल इंटेलिजन्स प्रणाली राबविण्यासाठी त्या क्षेत्रातील अधिकारी कर्मचारी तंत्रज्ञान यांना योग्य असे मार्गदर्शन आणि प्रशिक्षण दिले तरच ही प्रणाली उत्तम रित्या काम करू शकेल असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला.आर्टिफिशियल इंटेलिजन्स प्रणाली ही उद्योग विश्वाची संरचना बदलत असून पारंपरिक पुरवठा पद्धतींमधे आमूलाग्र बदल घडवीत आहे. भारतीय उद्योग विश्वापुढे जागतिक आवाहने असून आर्टिफिशियल इंटेलिजन्स प्रणाली ही या आवाहने सहजरीत्या हाताळत असून उद्योगव्यवस्थापन क्षेत्रात अचूक निर्णय घेण्याची क्षमता विकसित करत आहे.आर्टिफिशियल इंटेलिजन्स प्रणाली ही उद्योग क्षेत्रात सुलभता आणण्यासोबतच सबंधित उद्योग क्षेत्राचे कार्बन फुटप्रिंट कमी करण्यात सुद्धा मदत करत असल्याचे गडकरीनी यावेळी स्पष्ट केले.
इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मटेरीयल मॅनेजमेंट, नागपूर शाखेतर्फे आयोजित रेवॉल्युशनिंग सप्लाय चेन विथ आर्टिफिशियल इंटेलिजन्स या दोन दिवसीय परिषदेमधून पारंपरिक पुरवठा पद्धतीमधे आर्टिफिशियल इंटेलिजन्स प्रणालीद्वारे शाश्वत, विकसित, बहुआयामी अशे मुद्दे चर्चिले जातील असा विश्वास इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मटेरीयल मॅनेजमेंट नागपूरचे संचालक डॉ. व्यंकटरामन यांनी व्यक्त केला.
इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मटेरीयल मॅनेजमेंट, नागपूर ही मध्य भारतातील एक महत्त्वाची शैक्षणिक संस्था असून संस्थेमध्ये २०० पेक्षा अधिक सदस्य आहेत. संस्थेने विविध उद्योगक्षेत्रांशी चर्चा आणि सहकार्यातून कोर्सेस तयार केले असून ते पदवी आणि पदव्युत्तर या दोन्ही स्तरावर उपलब्ध आहेत. इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मटेरीयल मॅनेजमेंटचे राष्ट्रीय स्तरावर ओळख असून आंतरराष्ट्रीय स्तरावरील संस्थांशी संलग्नित आहेत. लॉजिस्टिक्स, सप्लाय चेन मॅनेजमेंट, इन्वेंटरी मॅनेजमेंट अश्या विविध विषयांवर संस्थेमध्ये प्रशिक्षण दिले जात असल्याची माहिती त्यांनी दिली.
इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मटेरिअल्स मॅनेजमेंट (IIMM) ही नवी मुंबई येथे मुख्यालय असलेली राष्ट्रीय सर्वोच्च संस्था आहे. IIMM ही मटेरियल मॅनेजमेंटशी संलग्नित व्यावसायिकांच्या विस्तृत क्षेत्राचे प्रतिनिधित्व करत असून सोर्सिंग, लॉजिस्टिक आणि सप्लाय चेन मॅनेजमेंट सारखी कार्य पार पाडते.