मुंबई :- लष्करप्रमुख जनरल मनोज पांडे 16 ते 17 मे 2023 या कालावधीतील इजिप्तच्या दौऱ्यासाठी रवाना झाले आहेत. या दौऱ्यात लष्करप्रमुख तेथील वरिष्ठ लष्करी नेतृत्वाची भेट घेणार आहेत. या भेटीत भारत इजिप्त संरक्षण संबंध अधिक वृद्धिंगत करण्याच्या संधींबाबत चर्चा होईल. इजिप्तच्या सशस्त्र दलांच्या विविध आस्थापनांना लष्करप्रमुख भेट देतील आणि परस्पर हिताच्या मुद्द्यांवर विचारांचे आदानप्रदान करतील.
लष्करप्रमुख, इजिप्तच्या सशस्त्र दलांचे सर्वोच्च प्रमुख , संरक्षण आणि लष्करी उत्पादन मंत्री आणि इजिप्तच्या सशस्त्र दलांचे प्रमुख यांच्याशी संवाद साधतील. ते इजिप्तच्या सशस्त्र दलांच्या संचालन प्राधिकरणाच्या प्रमुखांशी देखील विस्तृत चर्चा करतील.
इजिप्तसोबतचे भारताचे वाढते लष्करी संबंध भारताच्या 74 व्या प्रजासत्ताक दिन संचलन सोहळ्यात दिसून आले. या सोहळ्यात इजिप्तच्या सशस्त्र दलाची तुकडी प्रथमच उपस्थित होती. याशिवाय इजिप्तचे राष्ट्रपती अब्देल फतह अल-सिसी हे या संचलनासाठी प्रमुख पाहुणे होते. विशेष म्हणजे, भारतीय आणि इजिप्शियन सैन्याच्या विशेष दलांनी या वर्षी जानेवारीमध्ये “एक्स सायक्लोन-I” हा पहिला संयुक्त सराव केला.
लष्करप्रमुखांच्या भेटीमुळे दोन्ही सैन्यांमधील द्विपक्षीय संबंध अधिक दृढ होतील आणि दोन्ही देशांमधील अनेक सामरिक मुद्द्यांवर अधिक समन्वय आणि सहकार्यासाठी चालना मिळेल.