यवतमाळ :- जवाहर नवोदय विद्यालय निवड चाचणी 2025 करिता प्रवेशासाठी ऑनलाईन पध्दतीने अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरु असुन अर्ज करण्याची शेवटची तारीख 16 सप्टेंबर आहे. शैक्षणिक सत्र 2024-25 मध्ये वर्ग 5 वीत शिकत असलेले विद्यार्थी ऑनलाईन अर्ज करण्यास पात्र आहेत.
ही निवड चाचणी शैक्षणिक सत्र 2025-26 वर्ग 6 मध्ये प्रवेशाकरिता आहे. अर्ज ऑनलाईन पध्दतीनेच भरायचे आहे. निवड चाचणी शनिवार दि. 18 जानेवारी 2025 रोजी सकाळी 11.30 ते दुपारी 1.30 या कालावधीत होणार आहे. ऑनलाईन अर्ज भरण्यासाठी https://navodaya.gov.in आणि www.jnvyavatmal.com या संकेतस्थळाचा वापर करावा. अधिक माहितीसाठी जवाहर नवोदय विद्यालय, बेलोरा, ता.घाटंची येथे प्राचार्यांशी संपर्क साधावा.
विद्यार्थी जिल्ह्यातील रहिवासी असावा तसेच जिल्ह्यातील शासकीय किंवा मान्यताप्राप्त शाळेत इयत्ता पाचवीत सन 2024-25 मध्ये शिकत असावा. विद्यार्थ्याने सन 2022-23, 2023-24 व 2024-25 मध्ये सलग इयत्ता तिसरी, चौथी व पाचवी उत्तीर्ण केलेली असावी. विद्यार्थ्यांचा जन्म दि. 1 मे 2013 पूर्वी व दि. 31 जुलै 2015 (दोन्ही दिवस धरून) नंतर झालेला नसावा.
ग्रामीण उमेदवाराकरिता 75 टक्के जागा राखीव. काही जागा मुलींकरिता राखीव, इतर मागास वर्गीय, अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती आणि दिव्यांग उमेदवाराकरिता भारत सरकारच्या नियमानुसार जागा राखीव राहतील. ऑनलाईन अर्ज करण्याकरीता पाचवीत शिकत असलेल्या शाळांच्या मुख्याध्यापकांनी प्रमाणित केलेले प्रमाणपत्र, विद्यार्थ्यांचा फोटो, पालकांची व विद्यार्थ्यांची स्वाक्षरी, आधार माहिती तसेच सरकारी अधिकाऱ्यांनी प्रमाणित केलेले रहिवासी प्रमाणपत्र इत्यादी आवश्यक कागदपत्र तयार ठेवावे, असे विद्यालयाच्या प्राचार्यांनी कळविले आहे.