यवतमाळ :- आर्थिकदृष्ट्या मागास घटकातील उद्योजक बनू इच्छिणाऱ्या युवक, युवतींना आर्थिक साहाय्य पुरविण्याच्यादृष्टीने छत्रपती राजाराम महाराज उद्योजकता व कौशल्य विकास अभियानांतर्गत अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळातर्फे कर्ज व्याज परतावा योजना सुरु करण्यात आल्या आहे. या योजनांचा लाभ घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
महामंडळाच्या योजनांचा लाभ मराठा समाजातील तरुण, तरुणींना देण्यात येत आहे. महामंडळामार्फत अनेक शेतीपूरक व्यवसाय तसेच सेवा, उत्पादन व्यापार व विक्री आणि वाहन इत्यादी व्यवसायासाठी घेतलेल्या कर्जावर व्याज परतावा दिला जातो. महामंडळामार्फत वैयक्तिक कर्ज व्याज परतावा योजनेंतर्गत १५ लाखापर्यंत १२ टक्के प्रमाणे ४.५० लाखाच्या मर्यादेत आणि गट कर्ज व्याज परतावा योजनेंतर्घत कर्ज मर्यादा ५० लाखापर्यंत १२ टक्के प्रमाणे १५ लाखाच्या मर्यादेत जास्तीत जास्त ७ वर्षाकरिता व्याज परतावा करण्यात येतो. या योजनेकरिता स्त्री आणि पुरुष वयोमर्यादा ६० वर्ष आहे.
जिल्ह्यात आतापर्यंत विविध राष्ट्रीयकृत, सहकारी, खाजगी बँकेमार्फत ३२१ लाभार्थ्यांना सुमारे २२ कोटी ५६ लाख ३९ हजार ७८३ रुपयांचे कर्ज वाटप करण्यात आले असून २७७ लाभार्थ्यांना जवळपास २ कोटी २८ लाख ६३ हजार ५३२ रुपयांचा व्याज परतावा लाभार्थ्यांच्या बचतखात्यामध्ये जमा करण्यात आला आहे. या योजनेंतर्गत जिल्ह्यातील अनेक युवकांनी आपले विविध प्रकारचे व्यवसाय उभे केले आहे. जे लाभार्थी नियमित हप्ते भरत आहेत त्यांना व्याज परतावा सुद्धा नियमित देण्यात येत आहे.
लाभार्थ्यांनी www.udyog.mahaswayam.gov.in या संकेतस्थळावर उद्योजकता Enterpreneurship या Tab वरून ऑनलाईन नोंदणी करावी. नोंदणी नि:शुल्क आहे. अधिक माहितीसाठी जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, दारव्हा रोड, उद्योग भवन चौथा माळा, येथे संपर्क करावा, असे आवाहन जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राचे सहायक आयुक्त प. ब. जाधव यांनी केले आहे.