यवतमाळ :- मधमाशा वनस्पतींच्या परागीकरणात महत्वाची भूमिका बजावतात. त्यामुळे पिकांच्या उत्पादनात वाढ होते. मधाचे आयुर्वेदिकदृष्ट्या अनेक फायदे आहेत. त्यामुळे मधमाशीपालन काळाची गरज आहे.
राज्यात राष्ट्रीय मधुमक्षिकापालन व मध अभियान ही केंद्र पुरस्कृत योजना राबविण्यात येत आहे. त्यानुषंगाने महाराष्ट्र राज्य फलोत्पादन आणि औषधी वनस्पती मंडळ, पुणे यांना राष्ट्रीय मधुमक्षिका पालन व मध अभियान राबविणारी राज्यस्तरीय अंमलबजावणी यंत्रणा म्हणून केंद्र शासनाने मान्यता दिली आहे. सदर अभियानांतर्गत लघु अभियान 1, लघु अभियान 2 व लघु अभियान 3 समाविष्ट असून यामध्ये विविध उपक्रम राबविले जाणार आहेत.
कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालयाद्वारे राष्ट्रीय मधुमक्षिका मंडळ, नवी दिल्ली अंतर्गत मध आणि मधमाशी संबंधित अन्य उत्पादनांच्या योग्य स्त्रोताचा शोध घेण्याच्या दृष्टीने व अद्ययावत नोंदी ठेवण्यासाठी मधुक्रांती पोर्टल हे ऑनलाइन पोर्टल विकमित केलेले आहे. या पोर्टलवर मधुमक्षिका पालकांनी नोंदणी करावयाची आहे.
मधुक्रांती पोर्टल वरील नोंदणीमुळे मधुमक्षिका पालकांना नोंदणीकृत, मान्यताप्राप्त मधुमक्षिकापालक म्हणून ओळख मिळते. नोंदणीधारकांना 1 लाखापर्यंत फ्री विमा उपलब्ध होतो. विनाअडथळा मधुमक्षिका पेट्यांचे स्थलांतर इत्यादी लाभ मिळत आहे.
नोंदणीवेळी आधार कार्ड नाव, जन्मतारीख, पत्तासहित, आधार क्रमांकाशी जोडलेला अद्ययावत भ्रमणध्वनी क्रमांक, मधुमक्षिका पालनासंबंधित तपशील, मधुमक्षिका पालन प्रशिक्षण प्रमाणपत्राची सॉफ्ट प्रत, मधुमक्षिकापालकाचा मधुमक्षिका पेट्यांसमवेत फोटो इत्यादी कागदपत्रे आवश्यक आहे. नोंदणी शुल्क फक्त ऑनलाईन पद्धतीने अदा करता येते. त्यासाठी madhukranti.in/nbb हे संकेतस्थळ विकसित करण्यात आले असून यावर नोंदणी करणे आवश्यक आहे. अधिक माहितीसाठी 1800 1025 026 किंवा 020-29703228 या क्रमांकावर संपर्क साधावा.