यवतमाळ :- युवकांच्या अंगी असलेल्या सुप्त गुणांना वाव देणे व राष्ट्रीय एकात्मता वाढीस लागणे यासाठी केंद्र शासनाच्यावतीने यावर्षी सुध्दा जिल्हास्तर युवा महोत्सवाचे आयोजन करण्यात येणार आहे. महोत्सवात विविध स्पर्धा, सांस्कृतिक कार्यक्रम होणार असून त्यात सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
जिल्हास्तरीय युवा महोत्सवमध्ये सांस्कृतिक-सामुहिक लोकनृत्य, वैयक्तिक नृत्य, लोकगीत, वैयक्तिक लोकगीत, इंग्रजी, मराठी व हिंदी भाषेत कौशल्य विकास-कथालेखन, इंग्रजी व हिंदी भाषेत चित्रकला, वक्तृत्व स्पर्धा, कविता, संकल्पना आधारीत स्पर्धा, विज्ञान व तंत्रज्ञान यामधील नव संकल्पना, युवा कृती- हस्तकला, वस्त्रोद्योग, अॅग्रो प्रोडक्ट या बाबींचा समावेश आहे. या बाबींकरीता वयोगट 15 ते 29 वर्षा आतील युवक व युवतींना सहभागी होता येणार आहे. जन्मतारखेबाबत सबळ पुरावा म्हणून सोबत जन्मतारखेचा दाखला, आधार कार्ड झेरॉक्स सत्यप्रत आवश्यक.
स्पर्धेदरम्यान काही तांत्रिक अडचण निर्माण झाल्यास, योग्य तो निर्णय घेण्याचा अधिकार संयोजन समितीकडे राहील. कला प्रकारात सहभागी कलाकारांना आवश्यक ते साहित्य स्वतः उपलब्ध करुन घेणे बंधनकारक राहील. संयोजन समितीमार्फत फक्त विद्युत, स्टेज व्यवस्था उपलब्ध करुन दिली जाईल. स्पर्धा दरम्यान कोणत्याही स्पर्धकामार्फत असभ्य वर्तन तसेच सादरीकरणामध्ये असभ्यता, धार्मिक व राजकीय भावना दुखावणार नाहीत याची दक्षता घ्यावी. पंचांचा, परिक्षकांचा निर्णय अंतिम व सर्वांना बंधनकारक राहील. याबाबत कोणताही लेखी अथवा तोंडी आक्षेप स्वीकारला जाणार नाही.
इच्छुक युवक युवतींचे अर्ज दि.2 डिसेंबर पर्यंत स्विकारण्यात येईल. अधिक माहितीसाठी जिल्ह क्रीडा अधिकारी कार्यालय, यवतमाळ येथे संपर्क साधावा. दि.4 डिसेंबर रोजी होणाऱ्या जिल्हास्तरीय युवा महोत्सवामध्ये जास्तीत जास्त युवक व युवतींनी सहभाग नोंदवावा, असे आवाहन जिल्हा क्रीडा अधिकारी घनश्याम राठोड यांनी केले आहे.