– जादा पैसे आकारणाऱ्या सीएससी विरुद्ध कडक कारवाई
नागपूर :- हवामानातील प्रतिकूल परिस्थितीमुळे पिकांचे होणारे नुकसान टाळण्यासाठी केवळ एक रुपयाचा विमा हप्त्यात पिकांचा विमा उतरविण्याची सुविधा उपलब्ध करून दिली असून शेतकऱ्यांनी ३१ जुलै २०२३ पर्यंत विमा उतरविण्याचे आवाहन, विभागीय आयुक्त विजयलक्ष्मी बिदरी यांनी केले आहे. विमा हप्त्या व्यतीरिक्त शेतकऱ्यांकडून जादा रक्कम घेणाऱ्या सामूहिक सेवा केंद्रांविरुद्ध (सीएससी) कडक कारवाई करण्यात येणार आहे.
खरीप हंगामामध्ये पिकांचा विमा उतरविण्यासाठी राज्यात ९ विमा कंपन्यांमार्फत विमा उतरविण्यात येत असून पीक विमा योजनेमध्ये सहभागी होण्यासाठी शेतकऱ्यांना प्रती अर्ज केवळ एक रुपया भरून पीक विमा पोर्टलवर नोंदणी करायची आहे. शेतकऱ्यांना सामूहिक सेवा केंद्राच्यामाध्यमातून (सीएससी) नोंदणी करता येणार आहे. नोंदणीसाठी शेतकऱ्यांमागे प्रती अर्ज ४० रुपयांप्रमाणे विमा कंपन्यांकडून सामूहिक केंद्र चालकांना देण्यात येणार असल्याने शेतकऱ्यांकडून कुठल्याही प्रकारचे इतर शुल्क आकारण्यात येवू नये अशा सूचना बिदरी यांनी दिल्या आहेत.
नागपूर विभागात १५ लाख १४ हजार ४८३ शेतकरी खातेदार असून यापैकी २३ जुलै २०२३ पर्यंत ९७ हजार २८१ शेतकऱ्यांनी प्रधानमंत्री पीक वीमा उतरविला आहे. परंतु विभागातील बहुतांश शेतकऱ्यांनी या योजनेत अध्याप सहभागी झाले नाही. विभागातील १०० टक्के शेतकऱ्यांनी या योजनेत सहभागी होण्याचे होण्याचे आवाहन, बिदरी यांनी केले आहे.
पीक विमा योजनेत नोंदणी करतांना शेतकऱ्यांकडून एक रुपयांव्यतिरीक्त इतर कोणतेही शुल्क स्वीकारले जाणार नाही याची दक्षता घेण्यात यावी. विमा हप्त्या व्यतीरिक्त शेतकऱ्यांकडून जादा रक्कम घेण्यात येत असल्याचे आढळून आल्यास अशा सामूहिक सेवा केंद्रांविरुद्ध कडक कारवाई करण्यात येईल.
हवामान घटकाच्या प्रतिकुल परिस्थितीमुळे पिकांची पेरणी अथवा लावणी न झाल्यामुळे होणारे नुकसान टाळण्यासाठी तसेच पूर, पावसातील खंड, दुष्काळ आदी बाबींमुळे शेतकऱ्यांच्या अपेक्षित उत्पादनामध्ये घट होत असल्यास शेतकऱ्यांना प्रधानमंत्री पीक विमा योजनेमुळे विमा संरक्षणाचे कवच मिळणार आहे. शेतकऱ्यांनी कृषी सहायक, तालुका कृषी अधिकारी यांच्या मदतीने शेतातील पिकांचा विमा ३१ जुलै २०२३ पर्यंत उतरवावा असे आवाहन कृषी विभागाचे सहसंचालक राजेंद्र साबळे यांनी केले आहे.