– इराक, व्हिएतनाम, सौदी अरेबिया यांना केल्या जाणाऱ्या निर्यातीत उत्तम वाढ
नवी दिल्ली :- भारतातून कृषी निर्यातीला चालना देण्यासाठी कृषी आणि प्रक्रियाकृत अन्न उत्पादने निर्यात विकास प्राधिकरण(अपेडा) विविध उपक्रम हाती घेत आहे. अपेडाच्या दूरदर्शी धोरणांमध्ये, केवळ काही उत्पादनांवरील अवलंबित्व कमी करून मूल्य शृंखला वृद्धिंगत करण्यासाठी ताजी फळे, भाज्या, प्रक्रियाकृत पदार्थ आणि प्राणिज उत्पादने यासारख्या प्राधान्य उत्पादनांवर लक्ष केंद्रित करून निर्यातीतले घटक विस्तारण्याचा महत्त्वपूर्ण बदल समाविष्ट आहे. युरोप, लॅटिन अमेरिका आणि आशिया यांसारख्या प्रमुख बाजारपेठांमध्ये विस्तार करण्यावर लक्ष केंद्रित करून, अपेडाचे उद्दिष्ट आंतरराष्ट्रीय स्तरावर आपली उत्पादने प्रदर्शित करण्यासाठी जागतिक मोठ्या बाजारपेठांसह लहानलहान भागीदारी घडवण्याचे आहे. याखेरीज संशोधन संस्थांसोबतच्या समन्वयाद्वारे सागरी प्रोटोकॉल प्रस्थापित करून लॉजिस्टिक खर्च कमी करण्याबाबत संस्था काम करत आहे. स्पर्धात्मकता वाढवून आणि शाश्वत विकासाला चालना देऊन देशाच्या कृषी निर्यातीला चालना देण्याच्या अपेडाच्या वचनबद्धतेचाहे धोरणात्मक उपक्रम पुनरुच्चार करतात.
याखेरीज श्री अन्न – भरड धान्याला प्रोत्साहन देण्याचे अपेडाचे प्रयत्न हे अधिक आरोग्यदायी आणि वैविध्यपूर्ण पीक उत्पादन घेण्याच्या सरकारच्या धोरणाशी सुसंगत आहेत. गेल्या वर्षभरात, आंतरराष्ट्रीय भरडधान्य वर्ष -2023 या वर्षात विशेष लक्ष केंद्रीत करून, अपेडाने श्री अन्न ब्रँडअंतर्गत विविध मूल्यवर्धित उत्पादनांचा विकास आणि एकात्मीकरणासाठी परिश्रमपूर्वक कार्य केले आहे.
या धोरणात्मक उपक्रमामुळे पास्ता, नूडल्स, ब्रेकफास्ट सिरीयल्स, आइस्क्रीम, बिस्किटे, एनर्जी बार आणि उपाहाराचे पदार्थ यासह विविध मूल्यवर्धित उत्पादने तयार करण्यात आली आणि मुख्य प्रवाहात आणण्यात आली. श्री अन्न उत्पादनांचे वैविध्ययीकरण करून अपेडाने नावीन्य आणण्यासोबतच ही उत्पादने सुलभपणे निर्यात मूल्यसाखळीशी जोडली आहेत. या प्रयत्नांच्या माध्यमातून श्री अन्नची प्रतिष्ठा उंचावण्यात महत्त्वपूर्ण भूमिका अपेडा सातत्याने निभावत आहे. यातून आरोग्यदायी आहाराच्या निवडींना प्रोत्साहन देण्यासाठी आणि देशाच्या कृषी निर्यात घटकांचा विस्तार करण्याच्या सरकारच्या व्यापक कार्यक्रमात योगदान अपेडा देत आहे.
एप्रिल-नोव्हेंबर 2023 दरम्यान, अपेडाने इराक, व्हिएतनाम, सौदी अरेबिया आणि यूके सारख्या प्रमुख बाजारपेठांमध्ये निर्यात सुलभ केली आणि मागील वर्षाच्या तुलनेत लक्षणीय वाढ नोंदवली. अनुक्रमे 110%, 46%, 18% आणि 47% ने वाढलेला, हा उल्लेखनीय विस्तार प्रमुख बाजारपेठांमध्ये भारतीय कृषी उत्पादनांच्या वाढत्या जागतिक मागणीला अधोरेखित करतो.
सर्वसमावेशकतेला चालना देण्याच्या ध्येयाचा एक भाग म्हणून, अपेडाने स्टार्टअप, महिला उद्योजक आणि शेतकरी उत्पादक संस्था (एफपीओ/एफपीसी ) यांना पाठबळ पुरवून जागतिक कार्यक्रमांमध्ये सहभागी होण्यासाठी त्यांना सक्षम करत आहे.
निर्यातदारांच्या अभिप्रायाला प्रतिसाद देत अपेडा तुर्कीए, दक्षिण कोरिया, केनिया, दक्षिण आफ्रिका आणि जपान यांसारख्या उदयोन्मुख बाजारपेठांमधील नवीन मेळ्यांमध्ये सहभागी होण्यासाठी पुढाकार घेत आहे. या सक्रिय दृष्टिकोनाचा उद्देश भारतीय निर्यातदारांसाठी बाजारपेठांमध्ये अधिकाधिक प्रवेश सुलभ करणे आणि शाश्वत वाढीच्या संधींना चालना देण्याचा आहे.