– विभागीय आयुक्तांचा आदेश : काँग्रेसमध्ये खळबळ, सुनील साळवे यांनी दिला कारवाईचा अर्ज
नागपूर :- जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्ष रश्मी बर्वे यांना धक्क्यांमागून धक्के सहन करावे लागत आहेत. जात पडताळणी समितीकडून जात वैधता प्रमाणपत्र रद्द करण्यात आले. त्यापाठोपाठ रामटेकसाठी दाखल उमेदवारी अर्ज बाद करण्यात आला. सर्वोच्च न्यायालयातही त्यांना दिलासा मिळू शकला नाही. उच्च न्यायालयातही याचिकेवर सुनावणी सुरू होऊ शकली नाही. या सर्व घडामोडींनंतर आज त्यांना आणखीएक धक्का बसला. जात वैधता प्रमाणपत्र रद्द ठरविले गेल्याने त्यांचे जिल्हा परिषद सदस्यत्वही रद्द करण्यात आले. विभागीय आयुक्त बिदरी यांनी आज याबाबत आदेश काढले. तडकाफडकी आदेशानंतर काँग्रेसच्या गोटात एकच खळबळ उडाली आहे.
रश्मी बर्वे या अनुसूचित जातीसाठी आरक्षित टेकाडी सर्कलमधून निवडून आल्या. अडीच वर्षे त्यांनी अध्यक्षपदही भूषविले. त्यांचे जात वैधता प्रमाणपत्र जात वैधता पडताळणी समितीने रद्द ठरविले. त्यांच्याविरोधात तक्रार देणारे सुनील साळवे यांनीच जात वैधता प्रमाणपत्र रद्द करण्यात आल्याने बर्वेचे सदस्यत्वही रद्द करण्याचा अर्ज विभागीय आयुक्तांकडे दिला. त्याची दखल घेत विभागीय आयुक्तांनी बर्वे यांचे सदस्यत्व रद्द करण्याचे आदेश काढले. जिल्हा परिषद प्रशासनाकडून बर्वे यांना उद्या बाबत माहिती दिली जाणार असल्याचे समजते.
बर्वेचे सदस्यत्व रद्द केल्याने सत्ताधारी काँग्रेस पक्षाचे जिपतील संख्याबळही 33 वर आले आहे. मागील अध्यक्ष व उपाध्यक्षाच्या निवडणुकीत नाना कंभाले, प्रितम कौरे व मेघा मानकर या 3 सदस्यांनी बंडखोरी केली होती. त्यांच्यावर कारवाईसाठी कॉंग्रेसने जिल्हाधिकाऱ्यांकडे अर्ज केला आहे. या सर्व घडामोडीतच माजी उपाध्यक्ष मनोहर कुंभारे यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. त्यांच्या पत्नी सुमित्रा कुंभारे या काँग्रेसच्या सदस्य असून त्याही भाजपलाच समर्थन करतील, अशी चर्चा आहे. त्यामुळे येत्या काळात काँग्रेसची सत्ताही धोक्यात येण्याची शक्यता आहे.