पशुसंवर्धन विभागातील रिक्त पदे तात्काळ भरणार
नागपूर : जिल्ह्यात पशुसर्वधन विभाग राज्यस्तर व जिल्हा परिषद अशा दोन भागात विभागाला आहे. त्यास संपूर्ण राज्यस्तरीय करण्याचा प्रयत्न करण्यात येणार आहे. त्यासोबत जिल्ह्यातील पशुसंवर्धन विभागातील रिक्त पदे तात्काळ भरण्यात येईल, असे पशुसंवर्धन, दुग्ध व्यवसाय विकास, क्रीडा व युवक कल्याण मंत्री सुनील केदार यांनी सांगितले.
जिल्हास्तरीय पशुसंवर्धन विभागाची आढावा बैठक दि विदर्भ को ऑपरेटिव्ह मार्केटिग फेडरेशन येथे घेण्यात आली, त्यावेळी ते बोलत होते. जिल्हा परिषदेचे पशुसंवर्धन सभापती तापेश्वर वैद्य, पशुसंवर्धन उपायुक्त मंजुषा पुंडलिक, डॉ. सतीश राजु, नितीन फुके,जिल्हा परिषद सदस्य तसेच जिल्ह्यातील विभागाचे अधिकारी यावेळी उपस्थित होते.
जिल्ह्यात फक्त राज्यस्तरीय विभागच राहणार असून पशुसंवर्धन दवाखान्यातील परिचराची पदे तेथील पशुसंवर्धन अधिकाऱ्यांस 10 महिने तत्वावर भरण्याचे अधिकार देण्याविषयी प्रस्ताव लवकरच कॅबिनेट मध्ये सादर करुन त्यास मंजूरीसाठी देण्यात येईल, असे ते म्हणाले.
मांसल कुक्कुट पक्षी योजनेचा लाभ शेतकऱ्यांना देण्यात यावा. त्याचबरोबर गिर व शैवाल गायीचे उत्पादन वाढीवर भर देण्यात यावा, असे ते म्हणाले. याबाबत ग्रामीण भागात सर्वदूर विस्तृत जनजागृती करण्याचे आवाहन त्यांनी केले. जिल्हा परिषद सदस्यांना योजनेच्या जनजागृतीसाठी सहभागी करण्यात यावे, असेही ते म्हणाले.
खनिकर्म विभागाच्या योजनेचा लाभ लाभार्थ्यांना योग्य तऱ्हेने करुन जनावर वाटप करुन योग्य प्रमाणात दुध देणाऱ्या गायी त्यांना देण्यात याव्यात. शेतकऱ्यांना त्यांच्या आवडीनुसार गायींचे वाटप करण्यात यावे. या कामात काही पुरवठादार अयोग्य पुरवठा करतात असे निदर्शनास आले आहे. त्यांच्यावर कठोर कारवाई करण्यात येईल, असे ते म्हणाले.
राज्यामध्ये राष्ट्रीय कृत्रिम रेतनामध्ये नागपूर जिल्हा तिसऱ्या स्थानी असल्याचे उपायुक्त पुंडलिक यांनी सांगितले. यावेळी पुशविज्ञान केंद्र, विभागाची रिक्तपदे सेक्स सारटेड सिमेंन,कृत्रिम रेतन, प्रादेशिक अंडी उबलन केंद्र आदी विषयाचा आढावा श्री. केदार यांनी यावेळी घेतला.
ऐरोमॉडलिक शो बाबत बैठक
27 मार्च रोजी आयोजित एरोमॉडलिंग शोच्या बाबत पूर्व आढावा यावेळी घेण्यात आला. हा कार्यक्रम नागरिकांना फेसबुक लाईव्हद्वारे पाहता येणार आहे. त्याचबरोबर 5 हजार विद्यार्थ्यांचा समावेश राहणार असून 600 एनसीसीचे विद्यार्थ्यांचा सहभाग राहणार आहे. या शोचे 25 मार्च रोजी रिहर्सल होणार आहे. मानकापूर विभागीय संकुलातील बटमिंटन हॉलचे लाकार्पण सुध्दा यावेळी होणार आहे. 27 मार्च रोजी सकाळी 7 ते 9 वाजेपर्यंत होणाऱ्या या कार्यक्रमात नागरिकांनी मोठया संख्येने सहभाग घ्यावा, असे आवाहन श्री. केदार यांनी केले. क्रीडा व युवक सेवेचे उपसंचालक शेखर पाटील व इतर अधिकारी यावेळी उपस्थित होते.