भंडारा, दि. 20 : भंडारा वनविभागातील शीघ्र कृती दलात कार्यरत वाहनचालक अनिल शेळके यांना वन्यजीवांच्या संरक्षणात धाडसी व उत्कृष्ट कार्याबद्दल नुकतेच रजत पदक जाहीर झाले. वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या हस्ते डॉ. वसंतराव देशपांडे सभागृह नागपूर येथे आयोजित भव्य कार्यक्रमात ‘रजत पदक’ देऊन शेळके यांना गौरविण्यात आले.
कार्यक्रमाला प्रधान सचिव (वने) बी. वेणूगोपाल रेड्डी, प्रधान मुख्य वनसंरक्षक(वनबल प्रमुख) वाय .एल. पी. राव व ईतर अधिकारी कर्मचारी उपस्थित होते. भंडारा जिल्ह्यामध्ये मानव व वन्यजीव संघर्ष होऊ न देता वन्यप्राण्यांना Rescue करण्याचे अतिशय धाडसी व कठीण काम भंडाऱ्याची टीम करत असते. अनेकदा वन्यप्राण्यांना वाचवितांना शीघ्र कृती दलाचे सदस्य जखमी सुद्धा झालेले आहे. आपल्या जीवाची पर्वा न करता वन्यजीवांच्या संरक्षणाची धुरा वाहणाऱ्या चमूतील अनिल शेळके यांना शासनामार्फत “रजत पदक” देऊन सत्कार झाल्याने सर्व टीम मार्फत समाधान व्यक्त करण्यात येत असुन वनविभागात त्याच्या कार्याचे कौतुक करण्यात येत आहे.