– बर्थखाली आढळल्या दोन बॅग
– आरपीएफ गुन्हे शाखेच्या पथकाने घेतली झडती
नागपूर :-आरपीएफ गुन्हे शाखेच्या कर्तव्यदक्षतेमुळे मद्याची तस्करी फसली. अंदमान एक्सप्रेसच्या प्रत्येक डब्याच्या झडतीत बेवारस ट्राली बॅगमध्ये 80 हजार रुपये किंमतीची दारू मिळून आली. मात्र, दोन्ही बॅगवर कोणीही हक्क सांगितला नाही.
मध्य रेल्वेचे वरिष्ठ सुरक्षा आयुक्त आशुतोष पांडे यांनी अंमलीपदार्थाच्या तस्करीवर आळा घालण्यासाठी तसेच गुन्ह्यावर नियंत्रण मिळविण्यासाठी वेगवेगळे पथक तयार केले. या पथकात सहायक उपनिरीक्षक राजकुमार भारती, आरक्षक सागर लाखे, आरक्षक जसवीर सिंह, आरक्षक मुकेश गौतम, आरक्षक दिलीप कुमरे, नरेंद्र यादव यांचा समावेश होता.
यापथकातील सदस्य नागपूर रेल्वे स्थानकावर गस्तीवर असताना फलाट क्रमांक 2 वर 16032 अंदमान एक्सप्रेस थांबली. पथकातील सदस्यांनी गाडीचा ताबा घेतला. प्रत्येक डब्याची झडती घेतली असता एस-4 कोचमधील 23 आणि 24 नंबरच्या बर्थखाली दोन ट्राली बॅग बेवारस स्थितीत आढळल्या. जवानांनी विचारपूस केली असता बॅगवर एकाही प्रवाशाने आपला हक्क सांगितला नाही. त्यामुळे दोन्ही ट्राली बॅग खाली उतरवून तपासणी केली असता त्यात एका कार्टनमध्ये 80 हजार रुपये किंमतीच्या विदेशी दारूच्या 62 बाटल्या आढळल्या. संपूर्ण मुद्देमाल गुन्हे शाखेच्या ठाण्यात आणून सीसीटीव्ही निगरानीत नोंद केली. कागदोपत्री कारवाईनंतर पुढील कारवाईसाठी राज्य उत्पादन शुल्क विभागाकडे सुपूर्द करण्यात आला.