सावनेर :- जे का रंजले गांजले, त्यासी म्हणे जो आपुले तोचि साधू ओळखावा, देव तेथेची जाणावा।याप्रमाणे मानवसेवेतच देव असतो याची प्रचिती नुकतीच लायन्स क्लब द्वारे जाणवली. सावनेर पाहिलेपार निवासी शितल ज्ञानेश्वर उईके, २३ वर्षे हिचा लहानपणी तीन वर्षाची असतांना अपघात होतो आणि पुढे तिचा डावा पाय पूर्णपणे निकामी होतो. घरची आर्थिक परिस्थिती सुद्धा फारच बेताची. परंतु हळूहळू कुबड्यांचा सहारा घेऊन ती पुन्हा आयुष्य उभं करण्याचा प्रयत्न करते, दहावीची परीक्षा देते आणि शिवणकाम शिकून कुटुंबाचा आर्थिक स्रोत बनण्याचा प्रयत्न करते. सलाम तिच्या जिद्दीला! स्वबळावर चालण्यासाठी, पायावर उपचार करण्यासाठी ती आणि तिचे वडील सतत धडपडत असतात. अशातच या होतकरू,अपंग मुलीला मदतीसाठी लायन्स क्लब धावून येतो. तिच्या अपंगत्वावर मात करण्याचा प्रयत्न सुरु होतो. लायन्स क्लब मार्फत तिला उपचारासाठी, तपासन्यांसाठी अनेकदा नागपूरला पाठविण्यात येते. अल्टीअर हेल्थ केअर नागपूर यांचे सहकार्याने शीतलसाठी कृत्रिम पायाची डिझाईन तयार होते, अनेक चाचण्या होतात आणि शेवटी चार महिन्यानंतर कुबडिशिवाय चालण्याचे स्वप्न पूर्ण होऊ लागते.लायन्स क्लब सावनेर तर्फे नुकताच शितल ला कृत्रिम पाय समारंभपूर्वक प्रदान करण्यात येतो. या सर्व प्रवासात उपक्रम प्रभारी ॲड.अभिषेक मुलमुळे, चार्टर प्रेसिडेंट वत्सल बांगरे, विद्यमान अध्यक्ष डॉ. शिवम पुण्यानी, सचिव प्रा. विलास डोईफोडे, किशोर सावल यांची विशेष भूमिका राहिली. डॉ. परेश झोपे, डॉ. अमित बाहेती, डॉ. प्रवीण चव्हाण, डॉ. छत्रपती मानपुरे यांनी तिला वेळोवेळी मार्गदर्शन केले. अशा अनेक अपंग शितल समाजात आहेत त्यांच्या उपचारासाठी समाजातील दानशूर, संवेदनशील व्यक्तींनी पुढे येऊन लायन्स क्लब च्या उपक्रमांना हातभार लावावा अशी अपेक्षा यावेळी व्यक्त केल्या गेली. या प्रसंगी शितल आणि तिच्या वडिलांनी लायन्स क्लब पदाधिकाऱ्यांचे आभार मानले.
हा उपक्रम यशस्वी करण्याकरिता ॲड. मनोजकुमार खांगरे, प्रवीण टोणपे, हितेश ठक्कर, रुकेश मुसळे, प्रवीण सावल, पियुष झिंजूवाडिया, मिथिलेश बालाखे, हितेश पटेल, ॲड. प्रियंका मुलमुळे यांचे मोलाचे सहकार्य लाभले.