– ‘महाज्योती’मार्फत प्रशिक्षण घेतलेले 110 विद्यार्थी होणार फौजदार
नागपूर :- दर्जेदार प्रशिक्षण देण्याचे मोलाचे कार्य महात्मा ज्योतिबा फुले संशोधन व प्रशिक्षण संस्था (महाज्योती) नागपूर करीत आहे. उत्तम प्रशिक्षणाच्या जोरावर आज 2022 वर्षातील महाराष्ट्र लोकसेवा आयोगा (एमपीएससी) मार्फत घेण्यात आलेल्या पोलिस उपनिरीक्षक (पीएसआय) पदाच्या अंतिम निकालात महाज्योतीचा अमोल घुटूकडे याने राज्यात प्रथम स्थान आपल्या नावी केले. राज्यातील इतर मागास वर्ग (ओबीसी), विमुक्त जाती-भटक्या जमाती (व्हीजेएनटी) व विशेष मागास (एसबीसी) प्रर्वगातील विद्यार्थ्यांना मिळालेल्या मूल्याधिष्ठित प्रशिक्षण तसेच विद्यावेतनातून त्यांना अर्थसहाय्याचे पाठबळाच्या जोरावर आज एमपीएससीचे तब्बल 110 प्रशिक्षणार्थी हे पीएसआयच्या अंतिम यादीत मेरीट आलेत. विद्यार्थ्यांनी प्राप्त केलेल्या घवघवीत यशामुळे आज ते फौजदार होतील, अशी माहिती महाज्योतीचे व्यवस्थापकीय संचालक राजेश खवले यांनी दिली.
गेल्या 3 वर्षांपासून 2021-22 या वर्षात संस्थेकडून संघ लोकसेवा आयोग (युपीएससी), महाराष्ट्र लोकसेवा आयोग (एमपीएससी) तसेच युनिव्हर्सिटी ग्रॅन्ट कमिशन (युजीसी) मधील एकूण 5 हजार 995 विद्यार्थ्यांनी विविध प्रशिक्षणाचा लाभ घेतला. यातील विविध प्रशिक्षणांचा आणि योजनांचा लाभ घेणाऱ्या एकूण 110 प्रशिक्षणार्थ्यांनी एमपीएससीच्या अंतिम निकालात आपले नाव कोरले. यात 2021 च्या एमएपीएससी बॅचमध्ये प्रशिक्षण घेणारा सातारा जिल्ह्यातील मान तालुक्यातील दिवड गावातील अमोल भैरवनाथ घुटूकडे याने आपल्या मेहनतीच्या जोरावर पीएसआय परीक्षेची तयारी केली. एमपीएससी ने 2022 मध्ये झालेल्या पीएसआय परीक्षेचा निकाल नुकताच जाहीर केले. यात अमोल याने राज्यात प्रथम क्रमांक पटकाविण्याची कामगिरी केली. याशिवाय महाज्योतीचे पीएसआय परिक्षा देणारे एकूण 110 प्रशिक्षणार्थी हे अंतिम यादीत मेरीट आले आहेत.
शिक्षणाचे महत्व अबाधित आहे. शिक्षणामुळेच आपले स्वप्नांची दारांची चावी मिळविता येते. यानंतरच भविष्यात यशस्वी करियर घडविण्याचा मार्ग मोकाळा होत असतो. यानंतर विद्यार्थ्यांना शासन सेवेत योग्य ती संधी उपलब्ध करून देण्याचे कार्य हे ‘महाज्योती‘ करीत आहे. त्यामुळेच आज अमोल घुटूकडे या प्रशिक्षणार्थ्यांने पीएएसआय परीक्षेत पहिला क्रमांक आपल्या नावी केले आहे. तसेच पीएसआयच्या अंतिम निकालात 110 विद्यार्थी मेरीट आले असून आत ते फौजदार होऊन देशासह राज्याची सेवा करतील. विद्यार्थ्यांनी एकंदरीत मिळविलेले यश हे मिळालेल्या दर्जेदार प्रशिक्षणातूनच दिसून येत असल्याचा विश्वास राजेश खवले यांनी व्यक्त केले. महाज्योतीचे अध्यक्ष तथा इतर मागास बहुजन कल्याण विभागाचे मंत्री अतुल सावे यांनी महाज्योतीमार्फत उत्तीर्ण झालेल्या उमेदवारांचे अभिनंदन केले असून त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.