समाजाला पोलिसांचा अभिमान वाटेल असे कार्य करा – अमितेश कुमार

पोलीस प्रशिक्षणार्थींच्या 110 व्या सत्राचा दीक्षांत संचलन

        नागपूर : प्रशिक्षण घेऊन बाहेर पडल्यानंतर समाजात शांतता, सौहार्द वाढविण्याचे काम करा. तसेच समाजाला पोलिसांचा अभिमान वाटेल, असे कार्य करण्याचा सल्ला पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी प्रशिक्षणार्थी पोलिसांना दिला. शहरातील पोलीस प्रशिक्षण केंद्रातून बाहेर पडणा-या प्रशिक्षणार्थींच्या ११० व्या सत्राचा दीक्षांत समारंभ आज पार पडला. त्यावेळी ते प्रमुख अतिथी म्हणून बोलत होते.

            या प्रशिक्षण कालावधीत प्रशिक्षणार्थींची कार्यक्षमता तसेच मानसिक स्थिती बळकट करण्याचे काम होते. उत्कृष्ट दर्जाची परेड झाल्याबद्दल प्रशिक्षणार्थींचे अभिनंदन करताना जनतेच्या अपेक्षा पूर्ण करण्यासाठी आत्मपरीक्षण करून उत्कृष्ट सेवा देण्याचे आवाहन अमितेश कुमार यांनी केले. पोलीस जनतेसाठी चांगली सेवा देऊ शकतो, असेही ते यावेळी म्हणाले.

            प्रमुख अतिथी पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी दीक्षांत संचलनाची मानवंदना स्विकारली तसेच पोलीस प्रशिक्षण केंद्रांच्या प्राचार्य  चेतना तिडके यांच्या मार्गदर्शनाखाली नवप्रविष्ठ पोलीस प्रशिक्षणार्थी अमोल करे यांच्या नेतृत्वात परेडचे उत्कृष्ट संचलन करण्यात आले. या संचलनात एकूण 296 प्रशिक्षणार्थी सहभागी झाले होते.

             सह पोलीस आयुक्त  अश्वती दोरजे, विशेष पोलीस महानिरीक्षक छेरिंग दोरजे, पोलीस उपायुक्त चिन्मन पंडित, पोलीस उपायुक्त डॉ. अंकुश शिंदे, फॉरेन्सीक लॅबचे उपसंचालक विजय ठाकरे, प्राचार्य  चेतना तिडके, उपप्राचार्य  शोभा पिसे यावेळी उपस्थित होत्या.

            पोलीस प्रशिक्षण केंद्रातर्फे नऊ महिन्याच्या प्रशिक्षण कालावधीत राज्यातील विविध घटकातून एकूण 296 पोलीस प्रशिक्षणार्थींना पोलीस विभागातील कामकाजासह कायद्याचे, शस्त्रांचे व मैदानी कवायतीचे प्रशिक्षण देण्यात आले.

            कार्यक्रमादरम्यान अष्टपैलू प्रथम क्रमांक नाना सिरसाठ, व्दितीय सुरज देशमुख, तृतीय स्वप्नील खरात तसेच आंतरवर्ग प्रथम क्रमांक स्वप्नील खरात व बाह्यवर्ग प्रथम क्रमांक अमोल करे, उत्कृष्ठ पी.टी. प्रथम क्रमांक अमोल करे, सर्वोत्कृष्ट कमांडो सुरज देशमुख, सर्वोत्कृष्ट गोळीबार/नेमबाज अमर साळवी, परेड कमांडर अमोल करे यांना मुख्य अतिथींच्या हस्ते बक्षीस देऊन गौरविण्यात आले.

            या कार्यक्रमास आंतरवर्ग प्रमुख रामेश्वर पिंपरेवार, बाह्यवर्ग प्रमुख किसन नवघरे, राखीव पोलीस निरीक्षक तसेच सर्व पोलीस अधिकारी यांचे मोलाचे सहकार्य लाभले असून सेवानिवृत्त पोलीस अधिकारी तसेच बाहेर जिल्ह्यातून आलेले प्रशिक्षणार्थींचे पालकवर्ग आणि नातेवाईक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

            कार्यक्रमाचे सूत्रसंचलन राखीव पोलीस निरीक्षक  प्रतिभा भरोसे तर आभार उपप्राचार्य  शोभा पिसे यांनी मानले.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

Next Post

विजय गुप्ते आरोग्य रत्न अवार्ड से सम्मानित

Tue May 17 , 2022
नागपुर।  मेरुदंड, स्नायविक तथा अस्थिकंकालीय समस्याओं का औषधिविहीन योग बेस फिजीयोथेरपी से समाधान व व्यवस्थापन कर आरोग्य क्षेत्र में गत 35 वर्षो से उल्लेखनीय कार्य करने हेतु योग थेरेपिस्ट विजय गुप्ते  का उनकी आरोग्य सेवा में योगदान के लिए “जीरो माइल आइकॉन अवार्ड 2022” (आरोग्य रत्न) से सम्मानित किया गया। इस अवसर पर प्रमुख रूप से पूर्व मंत्री रमेश बंग, […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com