– आयुक्त डॉ. अभिजीत चौधरी यांनी केली अंबाझरी दहनघाटच्या बांधकामाची पाहणी
नागपूर :- अंबाझरी दहन घाटमध्ये जाणारा पूल तसेच नाग नदीच्या संरक्षण भिंतीचे काम पावसाळ्यापूर्वी पूर्ण करावे.. यासाठी युद्धपातळीवर कामे उरकण्यात यावे, असे निर्देश महापालिका आयुक्त तथा प्रशासक डॉ. अभिजीत चौधरी यांनी आज दिले.
अंबाझरी दहनघाटाकडे नाग नदीवरील पूल जीर्ण झाल्याने तोडण्यात आला आहे. या पुलाच्या बांधकामाचे तसेच संरक्षण भिंतीच्या बांधकामाच्या कामाची पाहणी महापालिका आयुक्त तथा प्रशासक डॉ. अभिजीत चौधरी यांनी आज केली. यावेळी सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता मनोज तालेवार, कार्यकारी अभियंता विजय गुरुबक्षानी, स्लम व डीपीडीसीचे कार्यकारी अभियंता कमलेश चव्हाण, एसडीसी मनोज गद्रे, कनिष्ठ अभियंता किशोर माथूरकर आदी उपस्थित होते.
जवळपास २७ मीटर लांबीचा असलेला हा पूल कमानच्या (आर्च) स्वरुपात राहणार आहे. विशेष म्हणजे सिंगल स्पॅनमध्ये बांधण्यात येत असल्याने नदीच्या पात्रात पिलर राहणार नाही. या पुलामुळे नाग नदीतील पात्रातील पाण्याचा प्रवाह अडणार नाही. त्याचप्रमाणे अंबाझरी तलावाकडून येणाऱ्या नागनदीतील पाणी वस्तीत जाऊ नये, यासाठी नागनदीमध्ये मजबूत संरक्षक भिंत उभारली जात आहे.
ही सर्व कामे पावसाळ्यापूर्वी पूर्ण करण्याचे निर्देश आयुक्त डॉ. चौधरी यांनी यावेळी दिले. पावसाळ्यात जनतेला त्रास होणार नाही, या खबरदारी घ्यावी, असेही निर्देश आयुक्तांनी यावेळी अधिकाऱ्यांना तसेच कंत्राटदारांना दिले.