त्रयस्थ तपासणी अहवाल प्राप्त झाल्यानंतरच देयके अदा  – मंत्री उदय सामंत

मुंबई :- सिन्नर नगरपरिषदेअंतर्गत स्वच्छ भारत अभियानाअंतर्गत सरस्वती नदी सौंदर्यीकरण व विकास कामे हाती घेण्यात आली. याबाबतची कामे करताना ई निविदा प्रक्रिया अवलंबून न्यूनतम धारकास काम देण्यात आले. काम पूर्ण झाल्यानंतर तसेच कामाची गुणवत्ता त्रयस्थ तपासणी अहवाल आल्यानंतरच संबंधित कंत्राटदारास देयके अदा करण्यात आल्याचे मंत्री उदय सामंत यांनी सांगितले.

विधानसभा सदस्य ॲड. माणिकराव कोकाटे यांनी सिन्नर नगरपरिषदेमार्फत शहरात करण्यात आलेल्या निकृष्ट कामांबाबतची लक्षवेधी सूचना मांडली होती.

मंत्री सामंत म्हणाले की, नदीतील गाळ काढणे, नदी काठी संरक्षक भिंत बांधणे, सांडपाण्याचे व्यवस्थापन करणे इत्यादी कामे यावेळी करण्यात आली आहेत. याबाबत जिल्हाधिकारी आणि उपविभागीय अधिकारी यांच्यामार्फत चौकशी केली असून त्यांच्याकडून संबंधित कंत्राटदाराने काम समाधानकारक केल्याचा अहवाल दिला आहे.

सिन्नर नगरपरिषदेने पाणी पुरवठा योजना कंत्राटदाराकडून ताब्यात घेतलेली नाही. सदर पाणी पुरवठा योजनेकरिता नियुक्त्‍ कंत्राटदाराने करारातील तरतुदीनुसार प्रकल्प पूर्ण क्षमतेने कार्यान्वित झाल्यापासून 1 वर्ष कालावधीसाठी देखभाल करणे अपेक्षित होते. मात्र कंत्राटदाराला प्रकल्प पुर्णत्वाची तारीख अमान्य असल्याने मा. मुंबई उच्च न्यायालयात रिट याचिका केली आहे.लवकरच सिन्नर नगरपरिषदेसंदर्भात बैठक घेण्यात येईल, असे मंत्री सामंत यावेळी म्हणाले.

Email Us for News or Artical - [email protected]
WP Twitter Auto Publish Powered By : XYZScripts.com