– केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या प्रयत्नांमुळे विणले जातेय शाश्वत महामार्गांचे जाळे
नागपूर :- केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी राष्ट्रीय महामार्गांच्या बांधकामात नवीन पर्यायी सामग्री व तंत्रज्ञानाचा वापर अनिवार्य केल्यानंतर भारताने शाश्वत महामार्गांचे जाळे विणण्याच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचे पाऊल टाकले आहे. यासोबतच ‘ग्रीन हाय-वे’च्या संकल्पनेला प्रत्यक्षात उतरविण्याच्या प्रयत्नांनाही यश आले आहे.
भारत सरकारच्या रस्ते वाहतूक व राष्ट्रीय महामार्ग मंत्रालयाने ना.गडकरी यांच्या दिशानिर्देशांनुसार नवीन व पर्यायी तंत्रज्ञान तसेच सामग्रीचा वापर बंधनकारक केला होता. यासंदर्भात एक अधिसूचना जारी करताना पर्यायी सामग्रीची यादी देखील मंत्रालयाने जाहीर केली होती. यात फ्लाय एश, टाकाऊ प्लास्टिक, रबराईज्ड बिटुमन (डांबर), स्टीलचे तुकडे, सॉईल स्टॅबिलायझर, सिलिका फ्यूम, कॉयर फायबर आदी नवीन व पर्यायी सामग्रीचा समावेश आहे. यासोबत मायक्रो सरफेसिंग, जिओग्रीडच्या सहाय्याने स्लोप स्टॅबिलायझेशन (उतारांची स्थिरता), रेन वॉटर हार्वेस्टिंग यासारख्या नवीन व पर्यायी तंत्रज्ञानाचा वापर मोठ्या प्रमाणात करण्यात आला. विशेषत्वाने गेल्या काही वर्षांमध्ये राष्ट्रीय महामार्गांच्या बांधकामात २४६ लाख मेट्रिक टन फ्लाय एश वापरण्यात आली आहे. तर देशभरातील साडेआठशे किलोमीटरच्या रस्त्यांमध्ये टाकाऊ प्लास्टिकचा वापर करण्यात आला. ना. गडकरी यांनी राष्ट्रीय महामार्ग आणि उड्डाणपुलांच्या बांधकामात फ्लाय एशच्या वापरावर विशेष भर दिला. दादरी, बदरपूर, पाली आणि पानिपत येथील औष्णिक प्रकल्पातून तयार झालेली १.२ कोटी क्युबिक मीटर फ्लाय एश इस्टर्न पेरिफेरल एक्स्प्रेस-वेच्या बांधकामात वापरण्यात आली. तर रांची-जमशेदपूर या ४४ किलोमीटरच्या चार पदरी महामार्गासाठी स्टील स्लॅगचा वापर करण्यात आला आहे. कर्नाटक, मध्यप्रदेश, महाराष्ट्र, राजस्थान, आसाम, उत्तर प्रदेश, झारखंड, आंध्रप्रदेश, दिल्ली, बिहार, तेलंगणा आणि गुजरात या राज्यांमधील राष्ट्रीय महामार्गांच्या बांधकामात प्लास्टिक वेस्टचा वापर करून एक अनोखा विक्रम मंत्रालयाने रचला आहे. यासारख्या पर्यायी सामग्रीच्या वापरामुळे रस्त्यांचे आयुष्य वाढविण्याचा आणि ग्रीन हायवेची संकल्पना प्रत्यक्षात उतरविण्याचा प्रयत्न असल्याचे ना.गडकरी यांचे म्हणणे आहे.
घनकचऱ्याचा ‘सॉलिड’ वापर
शहरातील घनकचऱ्याची विल्हेवाट कशी लावायची, हा देशातील अनेक शहरांपुढे असलेला मोठा प्रश्न आहे. पण, ना. गडकरी यांनी घनकचऱ्याचा वापर राष्ट्रीय महामार्गांच्या बांधकामात करून एक मोठा पर्याय उपलब्ध करून दिला आहे. देशभरात आतापर्यंत शहरातील विस्तारित मार्गांच्या बांधकामात ७ लाख टन सॉलिड वेस्टचा वापर करण्यात आला आहे. तर दिल्ली-मुंबई एक्स्प्रेसवे या अत्यंत महत्त्वाकांक्षी महामार्गाच्या बांधकामात ६ लाख टन सॉलिड वेस्ट मटेरियल वापरण्यात आले आहे.
महामार्गांच्या दुतर्फा वृक्षारोपण
राष्ट्रीय महामार्गांचे जाळे विणताना पर्यावरणाचा समतोल राखण्याच्याही सूचना ना. गडकरी यांनी प्रशासनाला दिल्या. त्यानुसार त्यांच्याच संकल्पनेतून राष्ट्रीय महामार्गांच्या दुतर्फा वृक्षारोपण करण्यात येत आहे. रस्ते वाहतूक व राष्ट्रीय महामार्ग मंत्रालयाच्या २०१५ च्या ग्रीन हायवे धोरणानुसार तसेच इंडियन रोड काँग्रेसच्या दिशानिर्देशांनुसार आतापर्यंत देशातील राष्ट्रीय महामार्गांच्या दुतर्फा ३.७३ कोटी झाडे लावण्यात आली आहेत.
झाडांचे प्रत्यारोपण
झाडांचे प्रत्यारोपण (ट्रान्सप्लान्टेशन) करण्याची एक अनोखी मोहीम ना.गडकरी यांच्या सूचनेनुसार राबविण्यात येत आहे. याअंतर्गत द्वारका एक्स्प्रेसवेवर १२ हजार झाडांचे ट्रान्सप्लान्टेशन करण्यात आले. यात महाराष्ट्रामध्ये अभिनेते सयाजी शिंदे यांच्या पैठण येथील सह्याद्री देवराईच्या सहकार्याने महाराष्ट्रात १३६ झाडांचे आतापर्यंत ट्रान्सप्लान्टेशन झालेले आहे. जुन्या आणि मोठ्या झाडांना मुळासकट हलवून त्यांचे दुसऱ्या ठिकाणी यशस्वी रोपण करण्यात येत आहे.