नागपूर : रेल्वे स्टेशन समोरील उड्डाणपूलाखालील बाधित होणाऱ्या परवानाधारकांपैकी आणखी 3 जणांना महामेट्रोद्वारे बांधण्यात आलेल्या दुकानांचे मनपाच्या बाजार विभागाद्वारे सोमवारी (ता. 20) ईश्वर चिठ्ठीने आवंटन करण्यात आले. यापूर्वी पहिल्या आवंटन प्रक्रियेत 23 व दुसऱ्या प्रक्रियेत 29 जणांना पर्यायी जागांचे आवंटन करण्यात आले.मनपा मुख्यालयातील डॉ. पंजाबराव देशमुख स्मृती स्थायी समिती सभागृहामध्ये ईश्वर चिठ्ठीद्वारे आवंटनाची प्रक्रिया पार पडली. मनपा आयुक्त तथा प्रशासक राधाकृष्णन बी. यांचे मार्गदर्शनात उपायुक्त मिलींद मेश्राम यांच्या उपस्थितीत संपूर्ण प्रक्रिया पूर्णत्वास नेण्यात आली. यावेळी मालमत्ता कर विभागाचे अधीक्षक प्रमोद वानखेडे, निरीक्षक अविनाश जाधव, संजय बढे, निलेश वाघुरकर आदी उपस्थित होते.
रेल्वे स्टेशन समोरील उडाणपुलाखाली असलेली दुकाने हटवून त्यांना पर्यायी जागा देण्याबाबत मनपाच्या सभागृहामध्ये निर्णय घेण्यात आलेला होता. त्यानुसार महामेट्रो द्वारे बांधण्यात आलेल्या दुकानांमध्ये सदर परवानाधारकांची पर्यायी व्यवस्था करण्याचा निर्णय घेण्यात आला. यासंबंधी उड्डाणपुलाखालील परवानाधारकांना मनपाद्वारे नोटीस देउन त्यांची सुनावणी घेण्यात आली होती. सुनावणीनंतर परवानाधारकांच्या सूचनेनुसार ईश्वर चिठ्ठीद्वारे पर्यायी जागेचे आवंटन करण्याचे निश्चित झाले.
यापूर्वी 20 मे 2022 रोजी पहिल्यांदा आवंटनाची प्रक्रिया पार पडली यामध्ये 23 जणांना पर्यायी जागा देण्यात आल्या. त्यानंतर 27 मे रोजी आवंटन प्रक्रियेमध्ये 29 जणांना ईश्वर चिठ्ठीद्वारे दुकानांचे आवंटन करण्यात आले. सोमवारी 20 फेब्रुवारी रोजी झालेल्या प्रक्रियेत 3 जणांनी सहभाग नोंदवला. ईश्वर चिठ्ठीत आलेल्या क्रमानुसार परवानाधारकांना पर्यायी जागेतील पसंतीचे दुकान निवडण्याची मुभा देण्यात आली होती. त्यानुसार परवानाधारकांनी आपल्या पसंतीची दुकाने निवडली. मनपाद्वारे प्रस्तावित प्रकल्पानंतर सदर परवानाधारकांना स्थायी स्वरूपाचे दुकान देण्याबाबतचा निर्णय मनपा सभागृहात यापूर्वी घेतलेल्या ठरावानुसार घेण्यात येणार आहे. पर्यायी जागेसंबंधी लवकरच मनपा आणि परवानाधारकांमध्ये करारनामा केला जाईल, अशी माहिती यावेळी उपायुक्त मिलींद मेश्राम यांनी दिली.