जागतिक महिला दिनानिमित्त विविध कार्यक्रम
नागपूर :- महिलांचे संरक्षण आणि सक्षमीकरणासाठी शासनस्तरावर प्रयत्न सुरू आहेत. समाजातील प्रत्येक घटकानेही या कार्यात पुढाकार घ्यावा. जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने आपल्या परिसरातील किमान पाच महिलांचे सक्षमीकरण करण्याचा संकल्प करू या, असे आवाहन विभागीय आयुक्त विजलक्ष्मी बिदरी यांनी आज येथे केले. विभागीय आयुक्त कार्यालयामध्ये आयोजित जागतिक महिला दिनाच्या कार्यक्रमात बिदरी बोलत होत्या. उपायुक्त सर्वश्री राजलक्ष्मी शहा, दीपाली मोतीयाळे, चंद्रभान पराते, घनश्याम भुगावकर, रमेश आडे, सहायक आयुक्त मनोहर पोटे आणि शंकर बळी या प्रसंगी उपस्थित होते.
हुंडाबळी, घरगुती हिंसाचार आदींमुळे महिलांची कुचंबना होते. या सर्व वाईट प्रथांपासून महिलांची सुटका होण्यासाठी त्यांना आर्थिकदृष्टया सक्षम होण्याची आवश्यकता आहे. शासनस्तरावर यासाठी विविध योजना व उपक्रम राबविण्यात येत आहेत. समाजातील सर्व घटकांनीही या कार्यात पुढाकार घेतला पाहिजे. या दिशेने एक सकारात्मक पाऊल म्हणून प्रत्येकाने आपल्या परिसरातील किमान पाच महिलांना सक्षम करण्याचा संकल्प घ्यावा असे आवाहन बिदरी यांनी केले.
सोशल मीडियाने मानवी जीवनावर खूप मोठा प्रभाव निर्माण केला आहे. या तंत्रज्ञानाचा वापर किती आणि कसा करावा हे प्रत्येकाच्या वापरण्यावर अवलंबून आहे. सभोवताली मन हेलावून टाकणाऱ्या घटना सतत घडत असतात. संसाराचा गाडा हाकण्यासाठी आज महिला घराबाहेर पडून नोकरी करू लागली आहे. आपण कर्तव्यावर असताना मुलांचीही खूप मोठी जबाबदारी स्त्रीवर असते यामुळे आपण आपल्या पाल्यांशी संपर्कात राहुन शाळेच्या होमवर्क व्यतिरिक्त इतर विषयांवर संवाद साधने खूप महत्वाचे आहे.
ऑफिस आणि घर यामध्ये संतुलन साधताना महिलांची बरीच ओढाताण होते परंतु घरामध्ये किंवा ऑफिसमध्ये एक सपोट सिस्टिम तयार झाली तर कुठलयाच कामच ओझ स्त्रीला वाटणार नाही. सार्वजनिक ठिकाणी महिला खरच सुरक्षित आहे काय हा खरा प्रश्न आज निर्माण झाला आहे. सामाजिक मानसिकता जोपर्यंत चेंज होणार नाही तोपर्यंत महिला खऱ्या अर्थाने सुरक्षित आहे असे म्हणता येणार नाही असे मत उपायुक्त राजलक्ष्मी शहा यांनी व्यक्त केले.
याप्रसंगी उपायुक्त चंद्रभान पराते यांनी विचार व्यक्त केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक दीपाली मोतीयाळे यांनी केले तर आभार चिरडे यांनी मानले. कार्यक्रमाला महिला अधिकारी व कर्मचारी यांची मोठ्या प्रमाणात उपस्थिती होती.
विविध कार्यक्रमाचे आयोजन
जागतिक महिला दिनानिमित्त आज विभागीय आयुक्त कार्यालयामधील महिलांनी नृत्य, गायन,एकपात्री प्रयोग सादर केले.