– १०८ जोडप्यांचा होणार थाटामाटात विवाह
यवतमाळ :- येथील सत् चिकित्सा प्रसारक मंडळाच्या वतीने यवतमाळ येथे रविवार, ९ जून रोजी श्री. सत्यसाई सर्वधर्मीय सामूहिक विवाह मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. स्थानिक हॉटेल वेनिशियनमध्ये सायंकाळी ६.३० वाजता होणाऱ्या या सोहळ्यात सर्वधर्मीय १०८ जोडपे विवाह बंधनात अडकणार आहेत. पालकमंत्री संजय राठोड हे या सर्वधर्मीय सामूहिक विवाह महोत्सव आयोजन समितीचे अध्यक्ष असून त्यांच्या मार्गदर्शनात या सोहळ्याची जय्यत तयारी सुरू आहे.
गरीबी, दारिद्य, नापिकी, खालावलेली आर्थिक परिस्थिती यामुळे मुला-मुलींच्या लग्नाची चिंता, लग्नाची सोय नाही म्हणून मुलीच्या किंवा तिच्या आई-वडिलांच्या होणाऱ्या आत्महत्या, मुला मुलींचे लग्न आई-वडिलांना बोजा वाटू नये, आई-वडील मुलांच्या लग्नाकरीता कर्जबाजारी होऊ नये, लग्नाकरीता होणारा अवास्तव खर्च टाळावा, ही संकल्पना लक्षात घेऊन येथील सत् चिकित्सा प्रसारक मंडळ या संस्थेने १९९४ मध्ये यवतमाळ येथे सर्वधर्मीय सामूहिक विवाह मेळाव्याची सुरूवात केली. तेव्हा तो भारतातील पहिला सामूहिक विवाह मेळावा होता. गेली ३० वर्षे सातत्याने हा सामुदायिक विवाह सोहळा होत आहे. संस्थेने यवतमाळमध्ये सुरू केलेल्या या चळवळीपासून प्रेरणा घेऊन राज्यात, देशात सर्वधर्मीय सामूहिक विवाह मेळाव्यांची सुरूवात झाली.
यवतमाळ येथे होत असलेल्या या विवाह मेळाव्यात वधू-वरांच्या पालकांकडून कुठलेही नोंदणी शुल्क घेतले जात नाही. यावर्षी सर्वधर्मीय सामूहिक विवाह सोहळ्यासाठी १०८ वधु-वरांनी नोंदणी केली आहे. विवाह सोहळ्यात सहभागी वधूंना बनारसी शालू, दोन साड्या, ड्रेस मटेरियल, सोन्याचे मंगळसूत्र, चांदीचे जोडवे, घड्याळ, सौंदर्यप्रसाधने, संसार उपयोगी भांडी आदी साहित्य दिले जाणार आहे. वरास शेरवानी, ड्रेस मटेरियल, मनगटी घड्याळ, बॅग इत्यादी भेटवस्तू व सोबतच पर्यावरण रक्षणासाठी वधू-वरांना केशर आंब्याचे सहा फूट उंचीचे रोपटे भेट देण्यात येणार आहे.
या विवाह महोत्सवात १०८ पेक्षा जास्त सहभागी मागास प्रवर्गातील अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, भटक्या जमाती, विमुक्त जाती विशेष मागास प्रवर्ग व इतर मागास प्रवर्गामधील वधु-वरांना महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाच्या वतीने आवश्यक कागदपत्रांची पूर्तता केल्यास २० हजार रुपये अुनदान देण्यात येणार आहे. तसेच शासनाच्या महिला व बालकल्याण विभागातर्फे वार्षिक उत्पन्न एक लाखापेक्षा कमी असणाऱ्या घटकांतील वधु-वरास निर्धारित वेळेत कागदपत्रांची पूर्तता केल्यास १० हजार रूपये अनुदान देण्यात येणार आहे.
यवतमाळ येथील हॉटेल वेनिशियन येथे होत असलेल्या या विवाह सोहळ्यात मुंबई येथील सुप्रसिद्ध गायक साईराम अय्यर यांच्या बहारदार गीतांचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. या विवाह सोहळ्यात जास्तीत जास्त जोडप्यांचा विवाह थाटामाटात व्हावा, याकरीता आयोजन समिती अध्यक्ष ना. संजय राठोड, सचिव डॉ. प्रकाश नंदुरकर व आयोजन समितीचे सदस्य परिश्रम घेत आहेत.