नवी दिल्ली :- बंजारा समाज हा संस्कृती आणि संस्कार जपणारा आहे. माझ्या मतदार संघात या समाजाची संख्या मोठ्या प्रमाणात असून यांच्या प्रश्नांची मला जाण आहे. या समाजाच्या ज्या देशव्यापी अडचणी आहेत त्या दूर करण्याचा मी निश्चित प्रयत्न करेल, असे प्रतिपादन लोकसभा अध्यक्ष ओम बिरला यांनी आज येथे संत सेवालाल यांची 286 वी जयंती कार्यक्रमाप्रसंगी केले.
येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर अंतरराष्ट्रीय सभागृहामध्ये आज संत सेवालाल चॅरीटेबल ट्रस्टच्यावतीने ‘बंजारा महोत्सवाचे’ आयोजन करण्यात आले. याअंतर्गत संत सेवालाल यांची 286 वी जयंती आणि रूप सिंग महाराज जयंतीचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला. यावेळी बिरला बोलत होते.
लोकसभा अध्यक्ष बिरला पुढे म्हणाले, संत सेवालाल यांनी मानवतेसाठी संदेश दिला आहे. भारतीय संस्कृती आणि संत पंरपरेला जगले आणि जगविले. हा समाज मोठया प्रमाणात आधी जंगलात राहायचा. पर्यावरण संवर्धानाचे काम मोठया प्रमाणात या समाजानेच केले आहे. स्वत:च्या गरजा सीमित ठेवून निर्सगाला वाढविण्याचे काम या समाजाने केले आहे. गुरू शिष्य पंरपरा टिकवून हा समाज पुढे जातो असेही बिरला म्हणाले.
राजस्थानमधील कोटा या आपल्या मतदार क्षेत्रात बंजारा समाजाची संख्या मोठी असल्याचे सांगत बिरला म्हणाले, त्यांच्या अडचणींची जाण आहे. बंजारा समाजाची बोलीभाषा, खानपान, वेशभुषा एक समान असूनही वेगवेगळया राज्यात वेगवेगळया वर्ग घटकात हा समाज मोडतो. त्याचा अभ्यास करून या समाजाला न्याय देण्याचा प्रयत्न करण्याचे आश्वासन त्यांनी यावेळी दिले.
तरुण पिढीला शिक्षण घेऊन पुढे येण्याचे आवाहन करत बिरला पुढे म्हणाले, हा समाज देशभर कुठेही जाऊन व्यवसाय करू शकतो, हे या समाजाचे गुण वैशिष्ट्य आहे. बिरला यांनी महाराष्ट्र शासनाने बंजारा समाजाची लोक पंरपरेवर आधारीत संग्रहालय बनवून त्यांच्या या पंरपरेला जोपासण्याचे आणि पुढच्या पिढीपर्यंत पोहचविण्याचे मोलाचे काम केले असल्याबद्दल कौतुक केले.
बंजारा समाजाच्या बोलीभाषेचा समावेश 8 व्या अनुसूचीमध्ये करावा – मृद व जलसंधारण मंत्री संजय राठोड
बंजारा समाजातील देशभरातील 14 कोटीपेक्षा अधिक लोक एकच गोर बोलीभाषा बोलतात, या बोलीभाषेचा समोवश संविधानातील 8 व्या अनुसूचीमध्ये करावा, अशी मागणी राज्याचे मृद व जलसंधारण मंत्री संजय राठोड यांनी कार्यक्रमामध्ये केली.
बंजारा लोक देशभरातील कोणत्याही राज्यातील असतील तरी त्यांची बोलीभाषा गोर ही एकच आहे. ते आपआपसात गोर भाषेतच संवाद साधतात. त्यामुळे या भाषेला सांविधानिक दर्जा मिळावा, असे ते यावेळी म्हणाले.
संत सेवालाल महाराज हे महान क्रांतीकारी, विज्ञानवादी, दूरदृष्टी असणारे संत होते. त्यांनी 250 वर्षा आधी सांगीतले होते, पाणी विकत घेऊन पिऊ अशीही एक वेळ येईल. आज ते सत्यात आपण पाहत आहोत.
संत सेवालाल महाराजांनी सांगीतले आंधळेपणाने कुणावरही विश्वास न ठेवता, तावून सुलाखून तपासल्यानंतरच विश्वास ठेवाव, असा विज्ञानवादी दृष्टीकोण संत सेवालाल यांचा होता.
महाराष्ट्र राज्य शासन संत सेवालाल महाराज यांची जयंती राज्यभर साजरी करून त्यांच्या कार्याला अभिवादन करते, असल्याचा उल्लेख त्यांनी यावेळी केला. राज्य शासनाने बंजारा समाजाला मुख्य प्रवाहात आणण्यासाठी बरीच पाऊले उचलली आहेत, बंजारा समाजतील आराध्य दैवत असलेले वाशीम जिल्ह्यातील पोहरादेवी या स्थळाचा जिर्णोउद्धार महाराष्ट्र शासनाने केलेला असल्याची माहितीही त्यांनी यावेळी दिली. वेगवेगळया राज्यात बंजारा समाजाचे नातेवाईक राहतात. त्यांची बोलीभाषा, पेहरावा, खानपान, चालीरीती, पंरपरा एकसारखे असूनही हे लोक वेगवेगळया वर्ग घटकात मोडतात. त्यामुळे काहीना शासनाच्या योजनेचा लाभ मिळतो तर काही वंचित राहतात. या बंजारा समाजातील सर्वांची प्रगती एक सारखी व्हावी यासाठी त्यांना एका वर्ग घटकात सामील करण्याची मागीणीही त्यांनी या मंचावरून केली. यासह राजधानी दिल्लीत बंजारा भवन उभारण्यासाठी जागा मिळावी, देशभर असणारे बंजारा समाजातील तीर्थस्थळांना विकसित करावे, अशीही मागणी त्यांनी यावेळी केली.
अमृता देवेंद्र फडणवीस यांना ‘बंजारा कला रत्न’ पुरस्कार प्रदान
सुप्रसिद्ध बँकर, गायीका, सामाजिक कार्यकर्ती म्हणुन ओळखल्या जाणाऱ्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सुविद्य पत्नी अमृता फडणवीस यांना आज ‘बंजारा कला रत्न’ पुरस्कार प्रदान करून सन्मानित करण्यात आले.
अमृता फडणवीस यांनी संत सेवालाल महाराज यांचे गुणगाण करणाऱ्या गाण्यांवर आधारित अल्बमध्ये ‘मारो दवे सेवालाल….’ हे गेय गीत गायले तसेच अभिनय ही केला. त्यांचे हे गाणे बंजारा समाजात अतिशय लोकप्रिय ठरत आहे.
फडणवीस यांनी त्यांचे मनोगताची सुरवात गोर या बोली भाषेतून करून उपस्थित समाजाची मने जिंकली. त्यांनी सांगीतले संत सेवालाल यांच्याबद्दलची अधिक माहिती गीत गाताना कळली. संत सेवालाल यांच्या आशीवार्दाने मी हे गाण गाऊ शकले. संत सेवालाल हे गोमाता प्रिय, स्त्रींचा आदर राखणारे, पर्यावरण प्रिय, सामान्य लोकांप्रती दयाभाव राखणारे असे महान संत होऊन गेले. संत सेवालाल हे आधुनिक आणि अध्यात्मिक दोन्हींचे मुर्तिमंत उदाहरण आहेत. आपण याच समाजाचा एक भाग असल्याचे आपल्याला प्रतित हो असल्याच्या भावना त्यांनी यावेळी आपल्या मनोगतात व्यक्त केल्या. या कार्यक्रमात त्यांनी पांरपारीक वेशभूषा धारण केलेल्या महिलांसोबत नृत्यही केले.
आज झालेल्या कार्यक्रमात देशभरातील 15 राज्यातून बंजारा समाजातील लोक त्यांच्या पांरपारीक वेशभूषेत सहभागी झालेत. सोलापूर जिल्ह्यातून खास मोठा हार स्वागतासाठी आणण्यात आला. या कार्यक्रमात लोक गीत आणि लोकनृत्य लोक कलाकरांनी सादर केले.