नागपूर :- स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षात जिल्ह्यात युवा मिशन राबवून 2 लक्ष नवमतदार नोंदणी करा. त्यासोबतच मिशन 75 अंतर्गत जिल्ह्याची मतदानाची टक्केवारी 75 टक्के झाली पाहिजे यावर फोकस करा, अशा सूचना जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी मतदार नोंदणी अधिकाऱ्यांना दिल्या. यासाठी आता विविध उपक्रम जिल्हा प्रशासन राबवणार आहे.
विशेष संक्षिप्त पुनरिक्षण कार्यक्रमांतर्गत मतदार नोदणी अधिकारी व सहाय्यक नोंदणी अधिकारी यांची स्विप अभियानाबाबत बैठक जिल्हाधिकारी कार्यालयातील बचत भवन येथे झाली, त्यावेळी ते बोलत होते. जिल्ह्यातील सर्व तहसिलदार, गटविकास अधिकारी यांना या बैठकिला पाचारण करण्यात आले होते.
जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी सौम्या शर्मा, अपर जिल्हाधिकारी आशा पठाण, उपजिल्हाधिकारी निवडणूक प्रविण महिरे यावेळी उपस्थित होते.
स्विप अंतर्गत या कालावधीत 75 उपक्रम राबविण्यात येणार आहे. त्यामध्ये मिशन डिस्ट्रीग्शन, मिशन युवा एन, मतदार दूत अशा 75 ॲक्टीव्हीटी राबविणार असल्याचे जिल्हाधिकारी यांनी सांगितले. लोकसभा व विधानसभा निवडणूक जवळच येत असल्यामुळे मतदार नोंदणीच्या कामास गती दया. बीएलओनी घरोघरी जावून पडताळणी करावी व मतदानाबाबत जनजागृती करण्याचे आवाहन त्यांनी केले. यासोबतच जिल्ह्यातील युवा संघटना, स्वयंसेवी संस्था, कॉलेजेस यांनीही या अभियानात सक्रिय सहभाग नोंदवण्याचे आवाहन ह्यांनी केले.
जिल्ह्यातील मतदानाची टक्केवारी वाढण्यासाठी सर्व मतदान अधिकारी, सहाय्यक मतदान अधिकारी व बीएलओनी जोमाने इलेक्शन मोडवर आतापासून काम करावे असे सागून नवमतदार नोंदणीसाठी प्रत्येक महाविद्यालयात युवा ॲम्बेसिडरची नेमण्याचे त्यांनी सांगितले.
सर्व मतदार संघात बीएलओ नेमा, कुठेही रिक्त जागा राहू नये, याबाबत काळजी घ्या. त्यासोबतच विविध स्पर्धाच्या माध्यमातून स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवी वर्षात मिशन 75 राबवा, असेही त्यांनी सांगितले.
जिल्हा प्रशासन, महापालिका व ग्रामपंचायत यांनी संयुक्तपणे या मिशनला यशस्वी करण्यासाठी व मतदान टक्केवारी वाढविण्यासाठी आराखडा आखून प्रयत्न करण्याचे आवाहन त्यांनी केले.
उपजिल्हाधिकारी निवडणूक प्रविण महिरे यांनी सादरी करणाद्वारे विशेष संक्षिप्त पुनरिक्षण कार्यक्रमाबाबत माहिती सादर केली.
या वेळी जिल्ह्यातील सर्व मतदार नोंदणी अधिकारी, सहाय्यक नोंदणी अधिकारी, बीएलओ उपस्थित होते.