नागपूर : दि. 23 नोव्हेंबर 2022 रोजी रात्री 1.30 ते 2 च्या दरम्यान कळमना कृषि उत्पन्न बाजार समिती, नागपूर येथील मिर्ची गळ्यामध्ये अचानक आग लागल्यामुळे कास्तकार व व्यापारी यांचे करोडो रुपयाचे नुकसान झाले आहे. संजय वाधवानी, वसंत पटले यांच्या खळ्यात ही घटना घडली असून आगीमुळे कँन्टीनसुद्धा स्वाहा झाली. आज घटनास्थळी जाऊन समितीचे सचिव यगलेवाड यांच्यासोबत निरीक्षण केले. आशिया खंडातील सर्वात मोठ्या कृषिमंडीमध्ये सुविधेचा अभाव असल्यामुळे कास्तकारांचा माल जळून खाक होणे, शेतमाल पावसात भिजणे अशा घटना वारंवार होत असतात.
तब्बल 110 एकडमध्ये पसरलेल्या या मंडीत कसल्याही प्रकारची व्यवस्था नसून व अन्य सुविधेचा अभाव मोठ्या प्रमाणात आहे. कास्तकार व व्यापारी अडचणीत असून सुद्धा इलेक्ट्रिक बिल वसुली म्हणून रु.18/- प्रति युनिट प्रमाणे घेतात, याचे आश्चर्य वाटते. सचिवांनी सर्व ठिकाणी एम.एस.ई.बी.च्या बिलाप्रमाणेच बिल भरतील, अशाप्रकारची सूचना दिली असून ती मान्य केली आहे.
उपरोक्त समस्याबाबत आज सभागृहात लक्षवेधीच्या माध्यमातून सभागृहात वाचा फोडली व आगीमध्ये झालेल्या करोडो रुपयाचे नुकसान APMC ने आपल्या तिजोरीतून भरून द्यावे व झालेल्या घटनेची उच्चस्तरीय चौकशी व्हावी व अशी मागणी आमदार कृष्णा खोपडे यांनी केली.
प्रशासनाने दिले गोलमोल उत्तर, शासनाची दिशाभूल करण्याचा प्रयत्न
कृषि उत्पन्न बाजार समिती, नागपूर येथे अनेक समस्या असून संचालक मंडळाचे व प्रशासनाचे याकडे सपशेल दुर्लक्ष आहे. सभागृहात आलेल्या या लक्षवेधीचे उत्तर देताना शासनाची दिशाभूल करण्याचा आरोप आमदार कृष्णा खोपडे यांनी केला. तसेच मंत्री महोदयांनी स्वत: वस्तुस्थिती जाणून उच्चस्तरीय चौकशी करावी, अशी विनंती आमदार कृष्णा खोपडे यांनी कृषि मंत्री दादा भुसे यांना केली.
यावर कृषि मंत्री दादाजी भुसे यांनी उच्चस्तरीय चौकशी निश्चित स्वरुपात होणार असल्याची ग्वाही सभागृहात दिली.