नागपूर :- हरभरा पिकावरील शेंडे, पाने व रोप कुरतडणारी अळीच्या (कट कर्म) प्रादुर्भावामुळे शेतकऱ्यांचे नुकसान टाळण्यासाठी कृषी विभागाकडून या अळीच्या व्यवस्थापन व उपाययोजनेचा सल्ला विभागीय कृषी सहसंचालक कार्यालयाकडून देण्यात आला आहे.
उशीरा पेरणी केलेल्या हरभरा पिकावर प्रामुख्याने कट कर्म या बहुभक्षीय अळीचा प्रादुर्भाव होतो. पिकाच्या कोवळ्या शेंडयावर ही अळी 300 ते 450 अंडी घातले. पिकावर रात्री येवून ही अळी पाने व शेंडे कुरतडते. पिकाच्या सर्व अवस्थांमध्ये या अळीचा प्रादुर्भाव हाऊ शकतो. पूर्ण वाढ झालेली अळी ही जमीनीमध्ये कोषावस्थेत जाते.
या किडीच्या व्यवस्थापनासाठी बांधावर कचऱ्याचे ढीग तसेच तण राहणार नाही अशा पद्धतीने नियोजन करणे, प्रति हेक्टर 20 पक्षी थांबे उभारावे. मादी पतंग अंडी घालू नये याकरिता निंबोळी अर्क 5 टक्के किंवा अझाडीरेक्टीन 300 पीपीएम 50 मिली किंवा अझाडीरेक्टीन 1500 पीपीएम 25 मिली प्रती 10 लिटर पाण्यात मिसळून फवारणी करण्याचा सल्ला विभागीय कृषी सहसंचालक उमेश घाटगे यांनी दिला आहे.
प्रादुर्भाव 2 अळ्या प्रति मिटर ओळ अशी आर्थिक नुकसानीची पातळी आढळून आल्यास क्लोरपायरीफॉस 20 टक्के ईसी 50 मिली किंवा क्लोरॅट्रॅनिप्रोल 18.5 टक्के 3.0 मिली प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. आवश्यकता भासल्यास 15 दिवसांच्या अंतराने दुसरी फवारणी करण्याचा सल्लाही देण्यात आला आहे.