Ø उत्पादक ते ग्राहक थेट विक्री
Ø नागरिकांनी जास्तीत जास्त संख्येने लाभ घ्यावा
Ø डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठात भव्य आयोजन
नागपूर :- शेतक-यांना शासनाच्या विविध कृषी योजना व उपक्रमाची माहिती, संशोधीत कृषी तंत्रज्ञान, नाविन्यपूर्ण प्रयोगशील शेतकऱ्याचे अनुभव, बाजारपेठ व्यवस्थापन, कृषीपुरक व्यवसाय आदी बाबत माहिती व मार्गदर्शन आवश्यक आहे. प्रयोगशील व प्रगतीशील शेतक-यांच्या माध्यमातून शेतकऱ्यांना आपसातील वैचारिक देवाणघेवाण करण्यास जिल्हा कृषी महोत्सवाच्या माध्यमातून व्यासपीठ उपलब्ध होणार आहे. महोत्सवामध्ये कृषी प्रदर्शन, कृषीविषयक परिसंवाद आणि अनुभवी शेतकरी व उद्योजकांची व्याख्याने, उत्पादक ते ग्राहक थेट विक्री या संकल्पनेवरआधारीत धान्य व खाद्य महोत्सव तसेच फळे, फुले व भाजीपाला महोत्सव आदींचे आयोजन करण्यात येत आहे. या कृषी महोत्सवाचा लाभ नागरिकांनी जास्तीत जास्त संख्येने घ्यावा, असे आवाहन कृषि तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणेच्या (आत्मा) प्रकल्प संचालक डॉ. नलिनी भोयर यांनी केले आहे.
महोत्सवाचा उद्देश
कृषीविषयक विकसीत तंत्रज्ञान व शासकीय योजनांची माहिती शेतक-यांपर्यंत पोहचविणे. शेतकरी-शास्त्रज्ञ आणि संशोधन- विस्तार- शेतकरी विपणन साखळी सक्षमीकरण समूह / गट संघटीत करून स्थापीत शेतकरी उत्पादक कंपन्याची क्षमता बांधणी करणे. शेतक-यांच्या उत्पादनास योग्य भाव मिळावा, ग्राहकांना उच्च दर्जाचा माल मिळावा याकरीता शेतकरी ते ग्राहक थेट विक्री संकल्पना विकसीत करणे. कृषी विषयक परिसंवाद / व्याख्यापनांच्या माध्यमातून विचारांच्या देवाणघेवाणीव्दारे शेतक-यांच्या समस्यांचे निराकरण करणे. विक्रेता खरेदीदार संम्मेलनाच्या माध्यमातुन बाजारभिमुख कृषी उत्पादनास आणि विपणनास चालना देणे. शेतकऱ्यांचे उत्पादन दुप्पट करण्यासाठी करावयाचे उपाययोजनांबाबत शेतक-यामध्ये जागती निर्माण करणे हाच उद्देश आहे.
खरेदीदार विक्रेते सम्मेलन
पूर्व विदर्भातील जिल्ह्यामध्ये नागपूरसह भंडारा व गडचिरोली जिल्ह्यात तांदूळ व संत्रा पिकाचे उत्पादन प्रामुख्याने घेतले जाते. पूर्व विदर्भात एच.एम.टी. डी. आर. के-२, चिनार, पार्वती सुत, सुवर्णा व प्रणाली या सारखे तांदळाचे वाण पिकविल्या जाते. विशिष्ट वातावरण व जमिनीच्या पोतामुळे उत्तम गुणवत्ता व खाण्यास रुचकर स्वाद यामुळे अती बारीक वाणास (Superfine Quality – Best Cooking Quality ) देशांतर्गत व निर्यातीसाठी मोठा वाव आहे. नागपूर जिल्हयातील शेतक-यांनी उत्पादीत केलेल्या सेंद्रिय शेतमाल व इतर अन्य तसेच एच. एम. टी. जयश्रीराम, चिन्नोर, पार्वतीसूत इत्यादी वाणांचा उच्च प्रतीचा तांदूळ ग्राहकांना शेतक-यांमार्फत थेट विक्री करण्यात येत आहे. या जिल्हयातील तांदूळ उच्च गुणवत्तेसाठी संपूर्ण देशात प्रसिद्ध आहे. शेतकरी अत्यंत कष्टाने घाम गाळून धान उत्पादन करतो आणि शेतक-यांना त्यांच्या पिकास पुरेसा मोबदला मिळत नाही. त्याशिवाय ग्राहकांना सुध्दा चढ्या भावाने व्यापा-याकडून शेतमाल खरेदी करावा लागतो व तांदळ विक्रीतून मोठा नफा मात्र व्यापारी कमवतात. शेतक-यांनीच उत्पादीत केलेला तांदूळ थेट ग्राहकांना विकला तर ग्राहकांनाही बाजारभावापेक्षा कमी दरात उच्च प्रतीचा तांदूळ उपलब्ध होणार व शेतक-यांनाही योग्य किंमत मिळणार आहे. याकरीता सेंद्रिय शेतमाल विक्री व धान्यमहोत्सव आयोजित करण्यात आलेला आहे.
पाच दिवसीय जिल्हा कृषी महोत्सवाचे आयोजन 4 ते 8 जानेवारी या कलावधीत डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ पद्व्युत्तर वसतिगृह, क्रिम्स हॉस्पीटलच्यासमोर, रामदास पेठ येथे करण्यात आले असून या महोत्सवात कृषी व संलग्न परिसवादाकरिता दालन करण्यात आले आहे. हे परिसंवाद दुसऱ्या व चौथ्यादिवशी होणार आहेत. त्यासोबतच उत्कृष्ट शेतकऱ्यांबरोबरच कृषी व संलग्न क्षेत्रात उल्लेखनीय कामगीरी करणाऱ्या शेतकरी, शेतकरी गट संस्थायांचा प्रशस्तीपत्र व स्मृतीचिन्ह देवून सन्मान करण्यात येणार आहे. येत्या 4 जानेवारी पासून सुरु होणाऱ्या पाच दिवसीय कृषी महोत्सवास नागरिकांनी एकदा भेट द्यावी, असे आवाहन कृषी विभागाद्वारे करण्यात आले आहे.
@ फाईल फोटो