मुंबई :- देशाच्या पंतप्रधानपदी विराजमान झाल्यानंतर नरेंद्र मोदी यांनी लगेचच पदाची जबाबदारी स्वीकारत पुढील कामांना सुरुवात केली आहे. याच धर्तीवर रविवारी मंत्रिपदाची शपथ घेतलेल्या केंद्रातील नवनियुक्त मंत्रिमंडळाची आज दिल्लीत पहिली बैठक होणार आहे. तिथं दिल्ली दरबारी सत्तास्थापनेनंतर अनेक घडामोडींना वेग आलेल्या असतानाच 2024 मधील लोकसभा निवडणुकीत मिळालेल्या अपयशानंतर आता महाराष्ट्रातही सत्तेत असणाऱ्या महायुतीकडून नवा डाव खेळला जाणार असल्याचं पाहायला मिळत आहे.
नुकत्याच हाती आलेल्या माहितीनुसार महाराष्ट्र राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार लवकरच होणार आहे. लोकसभा निवडणुकीत अपेक्षित यश न मिळाल्याने महायुतीतील नाराजी दूर करण्याचा प्रयत्न सरकारकडून केला जणार आहे. गेल्या कैक महिन्यांपासून रखडलेला मंत्रिमंडळाचा विस्तार लवकरच केला जाणार असून, विधानसभा निवडणुकीला सामोरं जाण्याच्या दृष्टीने सरकारने ही तयारी केल्याचं समजत आहे.
कोणाला मिळणार संधी?
राज्य मंत्रिमंडळ विस्तारावेळी शिवसेनेचा शिंदे गट, राष्ट्रवादीचा अजित पवार गट आणि भाजप अशा तिन्ही पक्षातील काही आमदारांना मंत्रिपदाची लॉटरी लागणार आहे. याशिवाय काही नवीन चेहऱ्यांनाही संधी दिली जाणार असल्याची माहिती मिळत आहे. त्यामुळं आता नेमकी कोणत्या आमदारांना मंत्रिपदाची लॉटरी लागणार हे पाहणं महत्त्वाचं असेल.
प्राथमिक माहितीनुसार विभागीय आणि जातीय संतुलन राखत मंत्रिमंडळाचा विस्तार करण्यात येईल. मुख्यमंत्र्यांसह एकूण राज्य मंत्रिमंडळाची संख्या 43 इतकी असू शकते. सध्या हा आकडा 29 मंत्री इतका आहे. म्हणजे येत्या काळात आणखी 14 जणांना राज्याच्या मंत्रिमंडळात स्थान मिळू शकतं. मंत्रिमंडळ विस्ताराशिवा. विविध महामंडळं आणि समित्यांसाठीच्या नियुक्ती प्रक्रियाही येत्या काळात पूर्ण केल्या जाणार सांगण्यात येत आहे.