“अंत्योदय साधण्यासाठी प्रशासनाचा चेहरा मानवी असणे गरजेचे” : राज्यपाल रमेश बैस 

काम मागणाऱ्यांपेक्षा काम देणारे हात तयार करा : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

मुंबई :-रोजगार हमी योजना आता केवळ रोजगार देणारी योजना नसून ग्रामीण भागातील लोकांना समृद्ध करणारी योजना आहे असे सांगताना योजनेच्या माध्यमातून अंत्योदय साधण्यासाठी प्रशासनाचा चेहरा मानवी असणे गरजेचे आहे असे प्रतिपादन राज्यपाल रमेश बैस यांनी येथे केले. 

राज्यपाल रमेश बैस यांच्या प्रमुख उपस्थितीत महात्मा गांधी राष्ट्रीय रोजगार ग्रामीण रोजगार हमी योजना महाराष्ट्र आणि शासनाच्या १७ विभागांच्या योजनांचे अभिसरण करून तयार करण्यात आलेल्या सुविधा संपन्न कुटुंब मिशन आणि सर्वांगीण ग्रामसमृद्धी योजनेचा शुभारंभ शुक्रवारी (दि. ३) करण्यात आला, त्यावेळी ते बोलत होते.

यशवंतराव चव्हाण सभागृह, मुंबई येथे झालेल्या कार्यक्रमाला राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, रोहयो आणि फलोत्पादन मंत्री संदीपान भुमरे, आमदार आशिष जयस्वाल आणि महेंद्र दळवी, शासनाचे अपर मुख्य सचिव नंद कुमार, मनरेगा आयुक्त शंतनू गोयल, लोकप्रतिनिधी तसेच राज्याच्या विविध जिल्ह्यांमधून आलेले अधिकारी उपस्थित होते.

देश स्वातंत्र्याचे अमृत पर्व साजरे करीत असताना महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना ग्रामीण भागांकरिता विकासाचे इंजिन सिद्ध होत असल्याचे नमूद करून राज्यात आज ६४ लाख कामगार २७००० ग्राम पंचायतींच्या माध्यमातून काम करीत असून त्यांच्या माध्यमातून ८ लाखांपेक्षा अधिक शाश्वत संपदा निर्माण होत असल्याचे राज्यपालांनी सांगितले. रोहयोच्या माध्यमातून ५० टक्के महिला काम करीत असून आर्थिक दृष्ट्या आत्मनिर्भर होत असल्याचे त्यांनी सांगितले. ही योजना प्रत्येक गरजू व्यक्तीपर्यंत पोहोचावी अशी अपेक्षा राज्यपालांनी व्यक्त केली.

काम मागणाऱ्यांपेक्षा काम देणारे हात तयार करा : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

मनरेगा सुविधा संपन्न कुटुंब व ग्रामसमृद्धी योजना ही शेतकऱ्यांना तसेच प्रत्येक गावाला समृद्ध करणारी योजना असून २६३ कल्याणकारी योजनांचा समावेश असणारी ही योजना समाजातील शेवटच्या घटकापर्यंत पोहोचवण्याचे काम प्रशासनाने करावे असे आवाहन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यावेळी केले. नोकरी करण्यापेक्षा शेती केली तर मोठा लाभ होईल असे सांगून ‘काम मागणाऱ्यांपेक्षा काम देणारे हात तयार करा’ असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.

यावेळी राज्यपाल व मुख्यमंत्र्यांच्या राज्याच्या विविध जिल्ह्यांमधील कार्यक्षम अधिकारी व कर्मचाऱ्यांचा सत्कार करण्यात आला. मुख्यमंत्र्यांच्या हस्ते रोजगार हमी योजना विभागाच्या संकेतस्थळाचे उदघाटन करण्यात आले तर फलोत्पादनची मागणी ऑनलाईन करण्याकरिता तयार करण्यात आलेल्या मोबाईल ॲप्ल‍िकेशनचे उदघाटन मंत्री संदीपान भुमरे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी महात्मा गांधी नरेगा केंद्र महाराष्ट्र – माहिती आणि तक्रार निवारण टोल फ्री क्रमांकाचे तसेच ‘यशोगाथा’ या स्मरणिकेचे व ‘यशोगाथा’ व्हिडीओ मालिकेचे देखील उदघाटन करण्यात आले.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

एलआयसीत विमाधारकांचा पैसा सुरक्षित - टि.के.चक्रवर्ती

Sat Mar 4 , 2023
– विदर्भ विमा पेंशनर्स असोसिएशनचे वार्षिक संमेलन थाटात संपन्न नागपुर : एलआयसी हि एक स्वायत्त संस्था असून आर्थिकद्रूष्ट्या मजबूत आहे. एलआयसी आपली ८० टक्के गुंतवणूक ही सर्वात सुरक्षित असलेल्या सरकारी बॅाण्डस् व कर्जरोख्यामध्ये करीत असते. उर्वरित २० टक्के गुंतवणूक भारत सरकारच्या संसदीय समितीच्या शिफारसीनूसार केली जाते.त्यामुळे अमेरिकन हिंडेनबर्ग संस्थेच्या अहवालाने गौतम अदानी समूहावर केलेले आर्थिक गैरव्यवहारांचे आरोप गंभीर असले व […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com