– मातीमोल भावात मोबाईल विक्री
– चार्जिंगवरील भ्रमणध्वनी चोरी
नागपूर :-चार्जिंगवर लावलेले मोबाईल चोरी करून मातीमोल भावात त्याची विक्री करतो. मिळालेल्या पैशात व्यसन पूर्ण करतो. तसेच मैत्रीणीवरही पैसे उडवितो. लोहमार्ग पोलिसांनी संशयाच्या आधारे त्याला पकडले. साहिल गौर (22), रा. गोंदिया असे अटकेतील मोबाईल चोराचे नाव आहे. त्याच्या ताब्यातून 10 महागडे मोबाईल जप्त करण्यात आले.
साहिलला आई वडिल आहेत. व्यसन आणि चोर्यामुळे पालकही त्रस्त झाले आणि नागपुरात राहायला आले. साहिल एकटाच गोंदियात राहातो. त्याला नशा करण्याची सवय आहे. व्यसन पूर्ण करण्यासाठी तो प्रवाशांचे मोबाईल चोरतो. चार्जिंगवर मोबाईल लावून प्रवासी आराम करतात. हीच संधी साधून तो सहज मोबाईल चोरतो. मोबाईलची मातीमोल भावात विक्री करून मिळालेल्या पैशाचा उपयोग व्यसन पूर्ण करण्यासाठी करतो. तसेच त्याला एक मैत्रीण आहे, तिच्यावरही पैसे उडवितो.
अलिकडे रेल्वेत मोबाईल चोरीचे प्रमाण वाढले. तसेच तक्रारी सुध्दा वाढल्या. याप्रकरणाची गंभीर दखल घेत पोलिस अधीक्षक डॉ. अक्षय शिंदे यांनी विशेष लक्ष घालून मोबाईल चोर्यांवर नियंत्रण मिळविण्यासाठी रेल्वे गाडीत पेट्रोलिंग वाढविली आहे. पोलिसांची गस्त वाढल्याने चोरीवर नियंत्रण मिळविण्यात आले. ही कारवाई उपविभागीय पोलिस अधिकारी हेमंत शिंदे यांच्या मार्गदर्शनात पोलिस निरीक्षक विकास कानपिल्लेवार यांच्या नेतृत्वात उपनिरीक्षक प्रवीण भिमटे, महेंद्र मानकर, चंद्रशेखर मदनकर, राजेश पाली, विनोद खोब्रागडे, अविन गजबे, राहूल यावले, गिरीश राउत, पंकज बांते आणि मंगेश तितरमारे यांनी केली.
गोंदियाला आला मोबाईल विक्रीसाठी
साहिलने छत्तीसगढच्या दुर्गमध्ये किरायने खोली घेतली. तो दुर्ग ते गोंदिया आणि गोंदिया ते नागपूर दरम्यान मोबाईल चोरी करतो. चोरी केलेले मोबाईल एका पिशवीत भरून विक्रीसाठी गोंदियात आला होता. संशयाच्या आधारे विचारपूस केली असता पिशवीत दहा मोबाईल असून सर्व चोरीचे आहेत, मोबाईलच्या विक्रीसाठी गोंदियात आल्याने त्याने पोलिसांना सांगितले. त्याच्या ताब्यातून 2 लाख 59 हजार 948 रुपये किंमती मुद्देमाल जप्त करण्यात आले.