कोंढाळी :- स्थानिक आदर्श विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयाचा स्नेहसंमेलन सोहळा नुकताच संपन्न झाला दिनांक 24 जानेवारी ते 27 जानेवारी पर्यंत चालणाऱ्या कार्यक्रमात विविध बौद्धिक, क्रीडा व सांस्कृतिक स्पर्धांचे आयोजन करण्यात आले. 26 जानेवारीला कचारी सावंगा शिक्षण संस्थेचे अध्यक्ष श्री शिवदयाल दुबे यांचे हस्ते ध्वजारोहण संपन्न झाले. या दिवशी शाळेत विविध सांस्कृतिक कार्यक्रम संपन्न झाले. यात आदर्श विद्यालय ,जिल्हा परिषद शाळा व समता कॉन्व्हेंट च्या विद्यार्थ्यांनी नृत्य व नाटिका प्रस्तुत केल्या. याप्रसंगी आदर्श विद्यालयाचे हस्तलिखिताच्या स्वरूपात असलेल्या वार्षिकांकाचे विमोचन शिवदयाल दुबे, श्रीकृष्णराव डीवरे, अरविंद भुमरे व शाळेचे प्राचार्य मुकेश दुबे यांच्या हस्ते करण्यात आले. दिनांक 27 जानेवारी रोजी शाळेचे सांस्कृतिक कार्यक्रम संपन्न झाले. धार्मिक व आध्यात्मिक ठेव असलेला व भक्तीने ओतप्रोत असा “पंढरीची वारी “हा कार्यक्रम घेण्यात आला. या कार्यक्रमात विविध अभंगांवर नृत्य सुद्धा सादर करण्यात आले. शंकर – पार्वती संवाद, चंद्रभागा नदीचा उगम, विविध संतांचे उपदेश, संतांच्या दिंड्या, संत मेळावा ,रिंगण सोहळा व पसायदान असे कार्यक्रमाचे स्वरूप होते. या सांस्कृतिक कार्यक्रमाचे उद्घाटन ह. भ. प. खुशालराव मापले महाराज यांच्या हस्ते घेण्यात आले. कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी म्हणून पंचायत समिती काटोलचे माजी सभापती संजयजी डांगोरे, कचारी सावंगा चे सरपंच रवि जयस्वाल, संस्थेचे कोषाध्यक्ष निलेश दुबे हे होते. याप्रसंगी गावातून पंढरपूरला पायदळ दिंडी सोबत गेलेल्या 24 वारकरी महिला व पुरुषांचे शाल व श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला.
“पंढरपूरची वारी “या कार्यक्रमात शाळेतील दीडशेपेक्षा अधिक विद्यार्थी सहभागी झाले होते. पताकाधारी, टाळकरी ,विणेकरी ,मृदुंग वादक, पालखी धारी, तुळशीधारी, लेझीम पथक, ध्वजधारी इत्यादी सर्व भूमिका शाळेतील विद्यार्थ्यांनी सादर केल्या. अभंगाचे स्वर व टाळ मृदुंगाच्या निनादाने वातावरण भक्तिमय झाले होते. शेवटी रिंगण सोहळा पार पडला व शेवटी पसायदानाने कार्यक्रमाचा शेवट झाला. या कार्यक्रमाला यशस्वी करण्यासाठी शाळेचे प्राचार्य मुकेश दुबे, शिक्षक , भारती दुबे, वैशाली खडकोदकर ,फुलवंती राऊत , शुभांगी धनगरे , रंजना निंबाळकर, आसोले , मीनाक्षी उके , अमोल बाभुळकर , प्रमोद जोगेकर , उमेश डांगोरे , प्रवीण कुमरे , पंकज बनसोड , गजानन जाधव , निशांत करडभाजणे , मनोज गणोरकर , विजया गोयले ,पृथ्वीराज गोयले इत्यादींचे सहकार्य लाभले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शुभांगी धनगरे यांनी तर आभार प्रदर्शन प्राचार्य मुकेश दुबे यांनी केले.