मुंबई : राज्यात पशुसंवर्धन विभागामार्फत पशु वाटप वैयक्तिक लाभाच्या योजनेअंतर्गत लाभार्थींची निवड ऑनलाईन पद्धतीने केली जाते. नागपूर जिल्ह्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूक आचारसंहितेमुळे ही प्रक्रिया ऑफलाईन पद्धतीने राबविण्यात आली होती. यामध्ये अनियमितता झाल्याचे आढळल्यास संबंधितांवर योग्य ती कारवाई करण्यात येईल, अशी माहिती महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिली.
नागपूर जिल्ह्यातील पशुसंवर्धन विभागाकडे वैयक्तिक लाभाच्या योजना राबविण्यासाठीचे अर्ज प्रलंबित असल्याबाबत सदस्य प्रवीण दटके यांनी प्रश्न उपस्थित केला होता. त्यास उत्तर देताना मंत्री राधाकृष्ण विखे पाटील बोलत होते.
मंत्री राधाकृष्ण विखे पाटील म्हणाले की, नागपूर, वर्धा, पुणे, सोलापूरमध्ये दुधाळ गायी, म्हशींचे गट वाटप करणे, शेळी, मेंढी गट वाटप करणे, एक हजार कुक्कुट मांसल पक्ष्यांच्या संगोपनासाठी निवारा शेड उभारण्यासाठी अर्थसाहाय्य देणे, १०० कुक्कुट पिलांच्या वाटपासाठी ऑनलाइन पद्धतीने लाभार्थींची निवड करण्यात येते. मात्र, ऑफलाईन पद्धतीने झालेल्या पशुवाटपाबाबत अनियमितता झाली असल्यास सविस्तर चौकशीअंती कारवाई करू, असे त्यांनी सांगितले.
सन 2022-23 मध्ये विविध वैयक्तिक लाभाच्या योजनांमध्ये लाभार्थींची ऑनलाईन पद्धतीने निवड करण्याची कार्यवाही प्रगतीपथावर असल्याचेही त्यांनी सांगितले.