मुंबई :- राज्यात गुटखा, पान मसाला आणि तत्सम प्रतिबंधित पदार्थांची वाहतूक करणाऱ्या वाहनांवर कारवाई केली जाईल, असे अन्न व औषध प्रशासन मंत्री धर्मरावबाबा आत्राम यांनी विधानसभेत सांगितले.
राज्यात तंबाखू मिश्रित पदार्थांची विक्री करणाऱ्यांवर कारवाई करण्याबाबतचा प्रश्न सदस्य आशिष शेलार, अतुल भातखळकर, योगेश सागर यांनी उपस्थित केला होता.
मंत्री आत्राम म्हणाले की, गुटखा,पान मसाला व इतर तत्सम प्रतिबंधित पदार्थांची वाहतूक करणाऱ्या वाहनांचा वाहतुकीचा परवाना तसेच वाहन चालकाचा परवाना रद्द करणेबाबत संबंधित प्रादेशिक परिवहन प्राधिकरणाला सूचना देण्यात आल्या आहेत.
राज्यात गुटखा उत्पादन करण्यास प्रतिबंध असून शेजारच्या राज्यामध्ये गुटख्याचे उत्पादन केले जाते. इतर राज्यातील उत्पादकांवर राज्य शासनाकडून थेट कारवाई करता येत नाही. परंतू राज्यात प्रतिबंधित पदार्थाच्या वाहतुकीसाठी वाहन, गोदाम वापरले तर ती वाहने,गोदाम सील करण्याबाबतचे संबंधितांना आदेश देण्यात आले आहेत.
अवैध गुटखा विक्री रोखण्यासाठी अन्न सुरक्षा व मानके कायदा, 2006 व नियम 2011 मधील तरतुदीनुसार कारवाई करण्यात येत असल्याचेही मंत्री आत्राम यांनी यावेळी सांगितले.