नागपूर :- महाडमधील ब्ल्यू हेल्थ केअर लिमिटेड या कंपनीत झालेल्या स्फोटप्रकरणी नेमलेल्या समितीचा अहवाल प्रलंबित आहे. अहवाल प्राप्त झाल्यानंतर कार्यवाही करण्यात येईल, अशी माहिती कामगार मंत्री सुरेश खाडे यांनी आज विधानसभेत दिली.
सदस्य अतुल भातखळकर यांनी यासंदर्भात लक्षवेधी सूचना मांडली होती, त्याला उत्तर देताना मंत्री खाडे बोलत होते.
महाडमधील ब्ल्यू हेल्थ केअर लिमिटेड या कंपनीमध्ये सात कामगार ठार झाल्याची घटना नोव्हेंबर 2023 मध्ये घडली होती. या दुर्घटनेत मृत्यूमुखी पडलेल्या व्यक्तींच्या कुटुंबियांना सानुग्रह अनुदान आणि भरपाई देण्यात आली आहे. याशिवाय राज्य कामगार विमा योजनेअंतर्गत जे लाभ देय आहेत ते देण्यात येत आहेत. याशिवाय त्यांच्यापैकी काही कामगारांच्या वारसाना कुटुंब निवृत्ती वेतन मंजूर झाले आहे. त्याच बरोबर योग्य ती मदत या कामगारांच्या वारसांना देण्यात आली आहे. मुख्यमंत्री सहायता निधीतून संबधितांना लाभ देण्यात आला आहे, अशी माहितीही त्यांनी यावेळी दिली.
यावेळी झालेल्या चर्चेत सदस्य गणपत गायकवाड यांनीही सहभाग घेतला.