– वर्धमाननगरातील एच.जी. इंडस्ट्रीवर मनपाचा छापा
नागपूर :- राज्यात सिंगल यूज प्लास्टिकवर बंदी असताना सुद्धा नागपुरात सर्रास कॅरी बॅगचे उत्पादन करणाऱ्या लकडगंज झोन अंतर्गत वर्धमाननगर स्थित एच.जी. इंडस्ट्रीज फॅक्टरीवर नागपूर महानगरपालिकेचा घनकचरा व्यवस्थापन विभागाने छापा टाकून जप्ती कारवाई केली, शुक्रवारी (ता: ४ ) रोजी करण्यात आलेल्या कारवाई दरम्यान ५८९ किलो प्रतिबंधित प्लास्टिक, कॅरीबॅग्स, खर्रा पन्नी ज्याची किंमत अंदाजे ७० हजार ६८० इतकी आहे त्याला जप्त करण्यात आले.
मनपा घनकचरा व्यस्थापन विभागाचे संचालक आणि उपायुक्त डॉ. गजेंद्र महल्ले यांनी सांगितले की, गुप्त सूचनेनुसार वर्धमाननगर स्थित एच.जी. इंडस्ट्रीज येथे सिंगल यूज प्लास्टिक कॅरीबॅगचे मोठ्या प्रमाणात उत्पादन सुरु असल्याची माहिती मिळाली. या माहितीनुसार मनपा आयुक्त तथा प्रशासक डॉ. अभिजीत चौधरी यांच्या निर्देशानुसार ही कारवाई करण्यात आली. शुक्रवारी (ता. ०४) संबंधित फॅक्ट्रीवर छापा टाकण्यात आला. याप्रसंगी ग्रीन फाउंडेशनचे श्रीकांत शिवणकर, उपद्रव शोध पथकाचे प्रमुख वीरसेन तांबे आणि त्यांची चमू सुशील गुप्ते, प्रेमदास तरवटकर, नथू खांडेकर, अरविंद बघेले, राणा प्रताप सिंह या संपूर्ण कारवाई प्रसंगी उपस्थित होती.
मनपातर्फे महाराष्ट्र पर्यावरण नियंत्रण विभागाला देखील याची माहिती देण्यात आली. महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे अधिकारी श्रीमती शीतल रविकांत उंधाडे, श्री. अमोल देशमुख याप्रसंगी उपस्थित होते. मनपातर्फे ५८९ किलो सिंगल युज प्लास्टिक जप्त केले असून, फॅक्टरी मालक हार्दिक गाडिया यांच्यावर प्रथम गुन्ह्याकरिता 5 हजार रुपये दंड ठोठावण्यात आला आहे.